Sunday, December 25, 2022

असे हे कर्मवीर - कथा क्र.5 बाणेदार कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र.5 - बाणेदार कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



1914 साली कोल्हापुरात इंग्लंडचे बादशहा सातवे एडवर्ड आणि महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्याला डांबर फासले गेले. या डांबर प्रकरण प्रकरणात दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांचा हात असल्याचा संशय कोल्हापूर संस्थानाच्या पोलिसांना होता. 

पूर्वी एकदा लठ्ठे यांनी कर्मवीरांना जैन वसतिगृहातून हाकलून लावले होते. जुन्या अपमानाचा बदला म्हणून कर्मवीरांनी लठ्ठे यांच्याविरुद्ध साक्ष दिली तर, तिचा वापर करून लठ्ठे यांना या प्रकरणात गुंतवता येईल. असा डाव लठ्ठेंच्या विरोधात असलेल्या गटाचा होता. त्यांच्याविरुद्ध केस उभी करण्यासाठी पुरावे गोळा करायला सुरुवात केली होती. यामुळे त्यांनी कर्मवीरांना कोल्हापुरात बोलावून घेतले.

पण, खोटी साक्ष द्यायला कर्मवीरांनी सपशेल नकार दिला. अनेक आमिषे दाखवूनही त्यांचा निश्चय ढळला नाही.

"आपण म्हणता त्याप्रमाणे मी मुळीच साक्ष देणार नाही." असे बाणेदार उत्तर कर्मवीरांनी दिले.

हे ऐकून ते अधिकारी चकित झाले, संतापले. कर्मवीर बाहेर गेल्यावर आपले पितळ उघडे पाडतील. याचीही भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी आणखी एक कारस्थान रचले आणि त्यात कर्मवीरांना अडकवले. पुन्हा एकदा खोटी साक्षी देण्यासाठी कर्मवीरांवर दबाव वाढवला. पण, कर्मवीर ठाम राहिले. 

नेहमी खरे बोलण्याचा कर्मवीरांचा पिंड होता. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी खोटेपणा करायचे टाळले. परिणामी, कर्मवीरांना अटक झाली आणि बराच काळ तुरुंगवास भोगावा लागला. 

तुरुंगवासादरम्यान पोलिसांनी कर्मवीरांवर अनेक अत्याचार केले. खोटी साक्ष देण्यासाठी बेदम मारहाण केली. अत्याचार सहन करूनही कर्मवीरांनी खोटी साक्ष न देण्याचा निर्णय बदलला नाही.

परिस्थिती कशी असली तरी, विचारांची बैठक पक्की असणा-या व्यक्ती, घेतलेल्या निर्णयावर सदैव ठाम असतात. महान व्यक्तिमत्वं काही मूल्य आयुष्यभर जपतात. म्हणूनच, ती मोठी महान असतात. कर्मवीरांनी नेहमी खरे बोलण्याचे, एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याचे तत्व आयुष्यभर जपले. कितीही त्रास झाला तरी ठाम राहण्याचा बाणेदार स्वभाव कर्मवीरांना खऱ्या अर्थानं "कर्मवीर" बनवून गेला.

कर्मवीरांना या प्रकरणातून निर्दोष सोडवण्यासाठी दुधगावचे थोर समाजसेवक श्री.भाऊसाहेब कुदळे यांनी अनेक प्रयत्न केले.

No comments: