Friday, December 30, 2022

श्री. दिपक मगर सर - एक खराखुरा दीपस्तंभ

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 श्री. दिपक मगर सर - एक खराखुरा दीपस्तंभ

🎯  श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. दिपक मगर सर यांना जाहीर झाला. त्यांच्या या देदीप्यमान यशाच्या निमित्ताने...




पाटण तालुक्यातील तारळे भागातील ढोरोशी हे मगर सरांचं गाव. आई-वडील शेतकरी. मुळातच दुर्गम तालुका, त्यामुळे शिक्षणासाठी इतरांसारखी पायपीट त्यांनाही करावीच लागली.


सरांनी घोट आणि तारळे शाळांत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. या माध्यमातून समाजाशी एकरूप होऊन, शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळांचं रुपडं पालटलं. सध्या ते मोगरवाडी या दुर्गम शाळेत कार्यरत आहेत. 


मोगरवाडी म्हणजे तारळे भागातील सर्वात दुर्गम ठिकाण. वाडीवर जायचं म्हणजे मोठा दिव्यच पार करावा लागे. 2018 साली झालेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत सरांनी मोगरवाडी ही दुर्गम शाळा निवडली.  


भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या वाडीवर पोचण्यासाठी, साधा रस्ता तयार करता आला नव्हता. उन्हाळ्यात या वाडीला धड नीट जाता येत नव्हते, पावसाळ्याची गोष्टच वेगळी. शाळा मंदिरात भरायची. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सरांनी या शाळेत काम करण्याचा "पण" केला. सुरुवातीला स्वखर्चाने जेसीबीने रस्सा तयार केला आणि नंतर लोकसहभागातून, श्रमदानातून शाळेची इमारत उभी केली. सुट्टीच्या दिवशी सातारा, तारळे भागातील शेकडो शिक्षक या शाळेत श्रमदानासाठी उपस्थित होते. भागातील अनेक दानशूर व्यक्तींनी या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे एक देखणी इमारत उभी राहिली. 

श्रमदानाच्या निमित्तानेच माझी व मगर सरांची पहिली भेट झाली. नंतर भेटीचा सिलसिला सुरू राहिला. फोनवर बोलणं वाढलं. यातून अनेक उत्तम विचार सरांकडून मिळाले. लेखनासंदर्भात अनेक "टिप्स" सरांकडून मिळायच्या. त्यांच्या प्रत्येक शब्दातून मोठी ऊर्जा व प्रेरणा मला मिळायची. 

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात सरांनी लिहिलेलं "संस्कारदीप" हे बहुपयोगी पुस्तक हाती पडलं. हे पुस्तक हाताळताना त्यांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव व्हायची. नंतर "संस्कारदीप" या नावाजलेल्या पुस्तकाचा लेखक माझा मित्र आहे. याचा माझा मला प्रचंड अभिमान वाटायचा. 

"यशवंत-एक प्रेरणास्त्रोत" या माझ्या ब्लॉगबद्दल सर जाणून होते. त्यांना ब्लॉग निर्मिती शिकायची होती. त्यामुळं अनेकवेळा सरांचा घरी जाणं झालं. नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती सरांच्या धडपडीतून जाणवली. या भेटी दरम्यान सरांचा व्यासंग जाऊन घेता आला.

शैक्षणिक कार्याबरोबरच सर सामाजिक कार्यातील सहभागी असतात. अक्षयपात्र चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तारळे भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जाते. या ट्रस्टच्या वाटचालीत सरांचा वाटा महत्त्वाचा आहे. 


सरांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन सातारा जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना जाहीर झाला आहे. 


शेवटी काय ! तर चाकोरी बाहेरचा विचार करणारं, कृतिशील आणि तितकंच गतिशील, मनात आणलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरविण्यासाठी अतोनात धडपड करणारं, नवं ते हवं म्हणत ते शिकणारं, मैत्रीभाव जपणारं एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच श्री.दीपक मगर सर होय. 


सरांच्या यशा बद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!!!

No comments: