Sunday, March 26, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 18 भविष्यवेत्ते कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 18 भविष्यवेत्ते कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.




"असे हे कर्मवीर" ही कथामालिका गेल्या चार महिन्यापासून सुरू कर्मवीरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जवळून अभ्यासता आले. अनेक संदर्भ वाचनात आले. मी सध्या कार्यरत असलेल्या बागणी गावचा उल्लेख कर्मवीरांच्या चरित्रात आला. कवयित्री सरोजिनी बाबर, कृ. बा. बाबर आणि शंकरराव सुखटणकर यांचे उल्लेख वाचनात आले. तेंव्हा आजच्या कथेचा धागा मिळाला. 

कर्मवीर आणि बागणी गावचे सुपुत्र, रयत शिक्षण संस्थेचे माजी जॉइंट सेक्रेटरी सुखटणकर या दोघांमधील ही कथा अर्थात भविष्यवेत्ते कर्मवीर

सातारा येथे सुरू केलेल्या ट्रेनिंग कॉलेज-अध्यापन विद्यालयाकरिता होतकरू आणि तरुण असा प्राध्यापक हवा होता. जो पुढे प्राचार्यपदाची धुरा सांभाळेल. यासाठी कर्मवीरांची शोधाशोध सुरू होती.

1936 मधील ही घटना. सांगली जिल्ह्यातील बागणी गावचा शंकरराव सुखटणकर नावाचा एक विद्यार्थी नुकताच बी.ए.,बी.टी. झाला होता. 

त्यावेळी पुण्याला शिक्षणाधिकारी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सरोजिनी बाबर यांचे वडील कृ. बा. बाबर हे होते. सुखटणकर हे बाबरांचे विद्यार्थी. त्यांच्यामार्फत सुखटणकर कर्मवीरांना भेटायला आलेले होते. कर्मवीरांनी सुखटणकरनां सांगितले की, "हे पहा सुखटणकर, माझ्या संस्थेत तुम्हाला यायची इच्छा असेल, तर माझ्या ट्रेनिंग कॉलेजवर उद्यापासून या. माझा हा शब्द म्हणजे तुम्हाला दिलेली आर्डर समजा आणि मला काय ते लवकर कळवा."

सुखटणकरांनी सरकारी नोकरीकरिता अर्ज केला होता. नाशिक येथील हायस्कूलवर त्यांची नेमणूक झालेली होती. कर्मवीरांना भेटून गेल्यानंतर घरी नेमणुकीचे पत्र आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुखटणकर कर्मवीरांकडे गेले. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. 

"आता काय करू?" असे सुखटणकर कर्मवीरांना विचारले.

तेंव्हा कर्मवीर म्हणाले, "हे पहा सुखटणकर, तुम्हांला जे काय सांगायचे ? ते कालच सांगितलेले आहे. आता काय निर्णय घ्यायचा ? तो तुम्ही ठरवा.”

“मी तुमच्या संस्थेमध्येच काम करेन. ठरले माझे !" सुखटणकर निश्चयपूर्वक म्हणाले.

कर्मवीरांना खूप आनंद झाला. सुखटणकरांची पाठ थोपटून म्हणाले, “सुखटणकर, या भाऊ पाटलाचा शब्द तुम्ही तुमच्या डायरीत टिपून ठेवा, की दोन वर्षांनंतर मी तुम्हाला डिप. एड. करिता फॉरेनला पाठवून देईन." 

आणि कर्मवीरांनी सांगितल्याप्रमाणे सुखटणकरांना डिप. एड. करिता एडिंबरोला पाठवून दिले.

सुखटणकर ,1939 साली डिप.एड. होऊन आले. कर्मवीरांच्याच ट्रेनिंग कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून काम करू लागले. सुखटणकर पुढे संस्थेचे आजीवसेवक झाले. पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. कर्मवीरांची वाणी खरी ठरली.

सांगायचं तात्पर्य हेच की, दिलेला शब्द खरा करणारे, सांगितलेले भविष्य खरे करणारे कर्मवीर होते. माणसाची पारख, त्याचं भविष्य घडविणं हे कर्मवीरांच्या जीवनाचे पैलू.

गोरगरिबांच्या जीवनातील अंधार दूर करून, त्यांचं उज्वल भविष्य घडविणारे कर्मवीर खऱ्या अर्थाने भविष्यवेत्ते होते. त्यांच्या दुधगांव येथील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. याकामी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तरी या पोस्ट च्या माध्यमातून आपणांस नम्र विनंती आहे की, आपण "फूल न फुलाची पाकळी देऊन" या कार्यास हातभार लावावा.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.
शाखा-दुधगाव
ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219

*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41

धन्यवाद...!!!

No comments: