Monday, December 4, 2023

श्री. हणमंत काटे साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने

श्री. हणमंत काटे साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने 



शिक्षकांना प्रेरणा देणारे, पाठीवरती कौतुकाची थाप देणारे, कठीण काळात पाठीशी राहणारे अधिकारीच दीर्घकाळ स्मरणात राहतात. कानांपेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवणारे, वरून काटेरी अन् आतून फणसासारखे गोड, आपल्या शिक्षकाची बाजू प्रशासनासमोर भक्कमपणे घेणारे, शिस्तप्रिय, प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. हणमंत परशराम काटे साहेब. ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त 30 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रप्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. त्या निमित्ताने हा लेखन प्रपंच...


18 नोव्हेंबर 1965 रोजी पाटण तालुक्यातील मुरुड भागातील भांबे या अतिशय दुर्गम खेड्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात काटे साहेबांचा जन्म झाला. ( भांबे हे गाव तारळी प्रकल्पांतर्गत आल्याने त्याचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनाच्या भयंकर यातना काटे साहेबांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी भोगल्या आहेत. सध्या या गावचे कराड तालुक्यातील वडगाव येथे करण्यात आले.) 


अतिशय हालाखीत त्यांची जडणघडण झाली. शिक्षणासाठी भांबे, कालगाव, हेळगाव व तारळे असा मोठा प्रवास त्यांना करावा लागला.  


बारावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम केला व कुटुंबाच्या चरितार्थास्तव नोकरी सुरु केली. कौटुंबिक परिस्थितीची जाण असल्याने पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळेच त्यांनी एमआयडीसीमध्ये कामगार म्हणून काम सुरु केले. 


28 ऑकटोबर 1985 हा दिवस काटे साहेबांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस. 

कारण, याच दिवशी त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्याच गावातल्या शाळेत, दहावीच्या गुणांवर अन्ट्रेण्ड म्हणून नोकरी मिळाली. पुढे त्यांनी डी.एड. आणि बी. एड. चे शिक्षणही पूर्ण केले.


1994 साल त्यांच्या संयमाची, जिद्दीची, शक्तीची परीक्षा घेणारं ठरलं. त्यांचं एक मूत्रपिंड निकामी झाल्याचं निदान झालं. हा एक मोठा मानसिक धक्का सर्व कुटुंबीयांसह त्यांना बसला. शस्त्रक्रिया करणे हा एकमेव मार्ग होता, परंतु त्यात जीविताची शाश्वती फार कमी होती. अशा बाक्या प्रसंगालाही त्यांनी धैर्याने तोंड दिले. एक नवं आयुष्य त्यांना पुन्हा लाभलं. 


पुढे मुरुड आणि मसूर या शाळांवर त्यांनी सेवा पदवीधर शिक्षक म्हणून काम केले तर, पंचायत समिती कराड येथे विषयतज्ञ व गटसमन्वयक पदाची धुरा सांभाळली. 2013 साली त्यांना केंद्रप्रमुखपदी बढती मिळाली.


पाटण तालुक्यातील विहे, मारूल हवेली, मल्हारपेठ तर, कराड तालुक्यातील तांबवे, पेंबर ,वहागाव, मलकापूर, काले, मसूर, उंब्रज आदी केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून कार्यभार लिलया सांभाळला. 


केंद्रप्रमुख म्हणून कामकाज पाहत असताना त्यांनी अतिशय देदीप्यमान कामगिरी केली. 

जिल्हा परिषद शाळा पेंबर (पाल) या शाळेची आंतरराष्ट्रीय शाळा, राज्य मॉडेल स्कूल म्हणून झालेली निवड हा त्यांचा हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च क्षण. 


शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1997 साली पंचायत समिती, पाटण ने "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन तर 2017 मध्ये पंचायत समिती, कराड ने त्यांचा विशेष गौरव करून सन्मानित केले आहे. 


काटे साहेब यांच्याशी माझी पहिली भेट झाली ते ठिकाण म्हणजे पापर्डे. त्यावेळी ते मारुल हवेली केंद्राचे केंद्रप्रमुख होते. केंद्रप्रमुख श्री. सुरेश चव्हाण साहेब यांच्यासोबत ते *माझ्या* शाळेत आले होते. मी नुकताच जिल्हा बदलीने आलो होतो. त्यामुळे "चांगलं काम करा. तुमच्यात ती क्षमता आहे." असा कृतिशील संदेश त्यांनी मला दिला. 


माझ्या आजवरची वाटचाल ही काटे साहेबांनी दिलेल्या प्रेरणेमुळे शक्य झाली आहे. पापर्डे शाळेत काम करताना, त्यांची प्रेरणा मोलाची ठरली. शाळेचे रंगकाम हाती घेतले, तेंव्हा त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. हे कौतुक केवळ शाब्दिक नव्हतं तर, ते त्यांनी माझ्या गोपनीय अहवालात ही नमूद केलं होतं. माझ्या गोपनीय अहवालात पहिल्यांदा *उत्कृष्ट* शेरा काटे साहेबांनीच दिला. त्यामुळे मला प्रचंड प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली अन् कामाची गती वाढली. यामुळेच पापर्डे शाळेत अडीच लाखांचा लोकसहभाग जमा करता आला. दोन डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, शालेय रंगकाम आधी भौतिक सुविधा निर्माण करता आल्या. अगदी वर्षभरातच काटे साहेबांची बदली कराड येथे झाली. बदली झाल्यानंतरही साहेबांशी असलेला स्नेह कायम राहिला.


कालांतराने सौ. राजश्री हिची जिल्हांतर्गत बदली पेंबर या आंतरराष्ट्रीय शाळेत झाली. योगायोगाने काटे साहेब पेंबरचे केंद्रप्रमुख होते. त्यामुळे साहेबांशी पुन्हा स्नेह वृद्धिंगत झाला.


वर्षभरातच आम्हां उभयंतांची आंतरजिल्हा बदली सांगलीला झाली. सौ. राजश्री हीस कार्यमुक्त होण्यासाठी केंद्रप्रमुखांचे ना देय प्रमाणपत्र आवश्यक होते. मी साहेबांना फोन केला. कल्पना दिली. त्यांनी घरीच येण्याचे निमंत्रण दिलं. आम्ही दोघेही साहेबांच्या घरी पोहोचलो. थोड्याफार गप्पा झाल्या. मी प्रमाणपत्र सहीसाठी ठेवले. तोपर्यंत साहेबांनी स्वतः टाईप केलेले अन् सही शिक्का केलेले पत्र माझ्यापुढे ठेवले अन् म्हणाले, "कदाचित बदलीच्या गडबडीत तुम्ही कागद आणायचा विसराल, मी स्वतः पत्र टाईप केले आहे." तेंव्हा मी अचंबितच झालो. घरातून निघताना साहेबांनी व कुटुंबीयांनी सौ. राजश्री चा व माझा यथोचित सन्मान करून निरोप दिला. 


एक माणूस म्हणून काटे साहेब "ग्रेट" आहेतच. परंतु, एक अधिकारी म्हणून त्यांचा "ग्रेटनेस" मला अगदी जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाला. साहेबांसारखे अधिकारी क्वचितच पाहायला मिळतात. 


शिक्षकांना प्रेरणा देणं, कौतुकाची थाप देणं, कठीण काळात पाठीशी राहणं, कार्यतत्पर, शिस्तप्रिय, मनमिळावू, प्रामाणिक वागणं, प्रेमळ बोलणं, कुशल प्रशासक, उत्तम संघटक, या काटे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वांचे अनेक मला सतत प्रभावी करतात. 


आज 38 वर्षांच्या अखंड सेवेनंतर साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा. साहेब तुमच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!


धन्यवाद...!

No comments: