Sunday, November 11, 2018

यशवंत–एक प्रेरणास्त्रोत भाग 21

तमाशा.... महाराष्ट्राची एक लोककला. या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांचे मनोरंजन गेली अनेक शतकं केलं जात आहे. पण, सोशल मिडीयाच्या या जगात या लोककलेला थोडी घरघर लागलेली आपल्याला दिसून येते. परंतु, या ही काळात ही कला टिकविणे अवघड असून देखील एका नृत्यांगनेने हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. बरं नुसतं पेललंच नाही, तर जवळजवळ 200 कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिले आहे. अशा त्या नृत्यांगनेचा, एका यशस्वी व्यावसायिकेचा हा संघर्षमय प्रवास......

वयाच्या सातव्या वर्षी तिच्या पायात एक किलो वजनाचे घुंगरू तिच्या कलावंतीण आईने बांधले. कारण, तिच्या सर्व मोठ्या मुली तमाशा आणि तिला सोडून गेल्या होत्या. निदान हिने तरी हा बोर्ड चालवावा.

आई प्रसिद्ध तमाशा कलावंत. प्रसिद्ध नृत्यांगना. आईच्या छत्रछायेखाली तिने नाच शिकला.

तिचे लग्न झाले. नवराही तमाशा कलावंत. तमाशासाठी कथा लिहायचा.

या दोघांनी स्वतःचा तमाशाचा फड उभा केला.

तिच्या आयुष्यातील संघर्षाचा प्रसंग कवठेमहांकाळच्या जत्रेत घडला.

ती नऊ महिन्याची गरोदर होती. तरीही ती बोर्डावर उभी राहिली.कारण, त्या फडाची ती एकमेव नायिका होती. जर तीच नसेल तर तमाशा कसा चालणार? आणि पोट कसं भरणार?

त्या तमाशात 'जावळीवर फडकला भगवा झेंडा' या वगाचं सादरीकरण सुरु होतं. ती 'मोहना' च्या आणि पती 'गणू शिर्के' च्या भूमिकेत होता. दोघांची जुगलबंदी सुरु होती आणि तिच्या पोटातील बाळाची जन्माला येण्यासाठीची लढाई सुरु होती. बेभान होऊन ती आपली कला सादर करत होती .ती इतकी बेभान झाली होती कि, तिचं बाळ या जगात प्रवेश करतंय. याची तिला जराही जाणीव झाली नाही. ती चक्कर येऊन पडली .तमाशा पाहायला आलेल्या वृद्ध महिलांनी तिची प्रसूती केली. ती शुद्धीवर आली आणि अवघ्या काही मिनिटातच ती पुन्हा स्टेजवर आली आणि पुढचा कार्यक्रम सादर करू लागली. ती नृत्यांगना म्हणजेच मंगलाबाई बनसोडे.

"लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची,
जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी 
पर्वा कुणाची पर्वा कुणाची"

वरील ओळी मंगलाबाईंच्या संघर्षाला अनुरुप ठरतील अशाच आहेत. पोटासाठी नाचताना जनाचीही पर्वा त्यांनी केली नाही. यामुळेच त्यांना या युगातही तमाशा ही कला जिवंत ठेवता आली. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

ज्या वयात खेळायचं, बागडायचं, शिकायचं. त्याच वयात मंगलाबाईंच्या पायात घुंगरू बांधले गेले. ज्या दिवसात आराम करायचा, त्याच दिवसांत त्यांना पोटासाठी स्टेजवर नाचावं लागलं. लहानपणी घुंगरू बांधले नसते, इतर बहिणींसारखं तमाशा सोडला असता, गरोदर असताना आराम केला असता तर, मंगला बनसोडे हे नाव आज कोणालाही माहिती झाले नसते.

आलेली परिस्थिती आपल्या मनासारखी मुळीच नसते. तिला आपल्या मनासारखी बनवावी लागते आणि यासाठी आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे लागते. हीच शिकवण मंगलाबाईंकडून आपल्याला मिळते.


-मंगला बनसोडे यांच्या प्रवासाच्या निमित्ताने.....*

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *मंगला बनसोडे यांच्या प्रवासाच्या निमित्ताने.....*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

🏵 _माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._ 

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

आज *यशवंत - एक प्रेरणास्रोत* चा 21 वा भाग प्रसारित केला. सदरचा भाग प्रसिद्ध 'लावणीसम्राज्ञी मंगलाबाई बनसोडे' यांच्या जीवन प्रवासावर आणि त्यांच्या संघर्षावर आधारित होता.

कवठेमंकाळ येथील तमाशाच्या कार्यक्रमात, गरोदर असूनही, त्या कला सादर करत होत्या. अशातच त्यांची प्रसूती झाली. काही मिनिटांतच त्या पुन्हा व्यासपीठावर येवून कला सादर करू लागल्या. हा प्रसंग आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेक वाचकांना भावला. त्यांच्या या संघर्षाला अनेकांनी सलाम केला. शिवाय लेखाणाचे कौतुक देखील केले.

"वरील प्रसंग हा मंगलाबाई बनसोडे यांच्या बाबतीत घडलेला नसून त्यांची आई विठाबाई यांच्याच बाबतीत घडला आहे.आपण एकदा सत्यता पडताळून पहावी." अशी सूचना काही वाचक मित्रांनी फोन करून, मेसेज करून कळविली.

या पोस्टच्या माध्यमातून मी आपणास नम्रपणे कळवू इच्छितो की, वरील प्रसंगाच्या बाबतीत विठाबाई आणि मंगलाबाई या दोघींच्याही बाबतीत साम्य आहे.

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनी वरील 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्या मुलाखतीचा आधार घेऊनच लेख लिहिला होता. या मुलाखतीत मंगलाबाई यांनी वरील प्रसंगाचे कथन केले आहे. या मुलाखतीतील 14 ते 16 मिनिटे या कालावधीतील त्यांचे कथन वरील प्रसंगाशी संबंधित आहे. सत्यता तपासून पाहण्यासाठी 'एबीपी माझा' या कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या मुलाखतीची लिंक खाली देत आहे. ऐका म्हणजे बराच संभ्रम दूर होईल.इतकेच.

धन्यवाद....


खालील लिंक वर क्लिक करा.


4 comments:

tanajikumbhar said...

खूपच छान सर
मस्त लिहीता य याच एक पुस्तक काढा

Muragesh Patil said...

संदीप पाटील सर आपले लेखन अतिशय सुंदर आणि कमी शब्दात परिपूर्ण माहिती प्रेरणादायी आहे . धावपळीच्या जीवनात शिक्षक, पालक समाजातील व्यक्ती व विद्यार्थी याना संपूर्ण पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही पण आपण ज्या यशवंतांची माहिती अतिशय कमी शब्दात व वाचकप्रिय लेखन केले आहे ,हे तुमचे मित्र म्हणून आम्हाला अभिमानास्पद आहे . नेहमी हसतमुख राहून इतरांसाठी काहीतरी करण्याची तुमची धडपड वाखाणण्याजोगी आहे . उत्कृष्ट लेखन करून मोफत सर्वाना उपलब्ध करून दिलेबद्दल धन्यवाद .पुढील लेखनास शुभेच्छा

Sandeep Patil, Dudhgaon said...

एम पी पाटील सर आपल्या या अभिप्रायाबद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे...

Unknown said...

ती व्यक्ती विठाबाई होत्या म्हणजे मंगला बनसोडे च्या आई