Wednesday, November 14, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 40

एका गर्भश्रीमंत व्यक्तीची मुलगी एका मुलाला जन्म देऊन कुमारी माता बनली. नंतर तिनं लग्न केलं. पण,वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. तिनं पुन्हा दुसरे लग्न केलं. कुमारी मातेचा तो पुत्र लहानपणापासूनच अत्यंत हुशार होता. आज त्यानं जगावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. तो पुत्र कोण? त्यानं कोणता पराक्रम केला? फार वेळ उत्सुकता ताणणार नाही. चला तर जाणून घेऊ आजच्या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास...

1994 चा काळ. तो कुमारी मातेचा मुलगा, आता तरुण झाला होता. त्याच्याजवळ एक चांगली नोकरी आणि सुंदर बायकोही होती. एक दिवस तो आपल्या ऑफिसमध्ये संगणकावर इंटरनेट ची प्रगती न्याहाळत होता. त्याच्या लक्षात आलं की,जगात इंटरनेट प्रचंड वेगानं लोकप्रिय होत आहे. त्याच्या डोक्यात ऑनलाइन पुस्तके विकण्याची कल्पना आली आणि त्यानं क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला. नोकरी सोडली आणि घराच्या गॅरेजमध्ये तीन संगणक आणि तीन कामगार घेऊन त्यानं कंपनी स्थापन केली.

एखाद्या गोष्टीची सुरुवात कोठून होते? यापेक्षा तिचा शेवट कोठे होतो? हे फार महत्त्वाचे असते.

ऑनलाइन पुस्तक विक्रीचा व्यवसाय जोरदारपणे सुरू झाला. बघता बघता कंपनी जगभर पसरली. आता कंपनी पुस्तकांबरोबर इतर अनेक वस्तू विकू लागली. शिवाय घरपोच सेवाही देऊ लागली. एका क्लिकवर हवी असणारी वस्तू घरात येवू लागली. त्यामुळेच प्रत्येक स्मार्टफोनधारकाच्या मुखी त्याच्या कंपनीचं नाव येऊ लागलं. ती लोकप्रिय कंपनी म्हणजे अमेझॉन डॉटकॉम आणि त्याचा संस्थापक आहे जेफ बेजोस.

जेफने काळाची पावलं ओळखली. आपली कल्पना सत्यात आणली. तो आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

मी एका ठिकाणी वाचलं होतं की, "एखादी अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात येण्यासाठी स्वतःहुन धडपडत असते. जर एखाद्या व्यक्तीकडून त्या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होत नसेल, तर ती कल्पना दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात येतेच." म्हणून मित्रहो,आपल्या अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करा. अन्यथा त्या कल्पना दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात आल्यास, आपल्याजवळ हळहळ करत बसण्याखेरीज पर्याय राहणार नाही.


No comments: