Wednesday, November 14, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 39

एकदा एका मानसशास्त्रज्ञाने खचाखच भरलेल्या सभागृहातील लोकांना प्रश्न केला कि, "कोणाकोणाला यशस्वी व्हायचं आहे?" संपूर्ण सभागृहाने हात वर केला. आता शास्त्रज्ञाने दुसरा प्रश्न केला. "यशस्वी होण्यासाठी कोणकोण आपल्या जीवाची बाजी लावेल?" आतामात्र सभागृहात शांतता पसरली. सर्व प्रकार शास्त्रज्ञाच्या लक्षात आला. त्याने सांगितले, "मित्रांनो यशस्वी सर्वांनाच व्हायचं असतं. पण, त्यासाठी खडतर प्रयत्न,मेहनत,कष्ट फारच कमी लोकं करतात आणि तिच यशस्वी होतात." मित्रांनो, मी आज एक असा यशवंत आपल्यासमोर सादर करतोय, ज्यानं अपघात झाल्यानंतरही आपलं सर्वस्व पणाला लावून ऑलम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई केली. चला तर  जाणून घेऊया त्या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास....

2004 च्या ऑलम्पिक स्पर्धेत 6 सुवर्णपदकांची कमाई करणारा एक जलतरणपटू 2008 च्या स्पर्धेची निर्धारपूर्वक तयारी करत होता. अचानक एका अपघातात त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्याने पोहण्याचा सराव करू नये. असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

आपली 10 वर्षाची मेहनत पाण्यात जाणार ?सर्वाधिक सुवर्णपदक मिळविण्याचं त्याचं स्वप्नं धुळीस मिळणार ? या विचाराने तो बेचैन झाला. पण, मित्रांनो त्याचा निर्धार खुप पक्का होता. त्यानं 2008 च्या स्पर्धेत संपूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला.

आपल्या प्रशिक्षकासह तो समस्येवर उपाय शोधू लागला. म्हणतात ना, 'गरज ही शोधाची जननी आहे.' नेमकं असचं काहीसं त्याच्या बाबतीत घडलं. त्याला त्याच्या समस्येवर उपाय सापडला. पोहताना हाताऐवजी पायांचा वापर जास्त करायचा. आपल्या पायांच्या अधिक मजबूतीसाठी तो अधिक सराव करू लागला आणि खरोखरच चमत्कार झाला. बीजिंग ऑलम्पिकमध्ये त्या जलतरणपटू ने सर्वाधिक 8 सुवर्णपदक जिंकले. तो प्रसिद्ध ऑलम्पिकवीर म्हणजेच मायकल फ्लेप्स होय.

समस्यांचं नसणं म्हणजे यशस्वी असणं नाही. तर समस्यांवर विजय मिळवणं म्हणजे यशस्वी असणं होय. मायकल च्या जीवनात अपघाताच्या रूपाने जी समस्या निर्माण झाली. त्यावर  विजय मिळवून मायकल ने सर्वाधिक सुवर्णपदक मिळवून 36 वर्षा पूर्वीचा विक्रम आपल्या नावावर केला. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

मित्रहो, यशस्वी होण्यासाठी खडतर मेहनतीची गरज असते. प्रयत्नाशिवाय मिळालेलं यश हे फुग्यासारखं असतं. कधी फुटेल ? सांगता येत नाही. याउलट खडतर कष्टाने मिळालेले यश. हे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे असते. जे उत्तरोत्तर वाढतच जाते.


No comments: