Wednesday, November 14, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 38

जन्माला आलेला प्रत्येक जीव पोटासाठीच धडपडत असतो.माणूस मात्र पोटासाठी कामधंदा बघतो.व्यवसाय करतो, नोकरी करतो.नोकरी मिळाली कि, लाईफ सेटल होऊन जाते आणि सगळं कसं सुरळीत होतं.ही नोकरदारांची मानसिकता.कधीकधी नोकरीत ब्रेक मिळतो तर कोणी नोकरी सोडतं.पण,नोकरी गेल्यावर काय पळापळ होते.हे ज्याचं त्यालाच माहीत.नोकरी शोधताना मिळणारे नकार,त्यातून निर्माण होणारे नैराश्य अन नैराश्यातून लागणारे व्यसन,या गोष्टी आपण आपल्या अवतीभवती अनुभवल्याच असतील.मी आज ज्याची  कथा आपल्यासोबत शेयर करणार आहे,त्याला ज्या कंपनीत नोकरीसाठी नाकारलं गेलं,त्याच कंपनीचा तो महत्त्वाचा शेयरधारक बनला.त्याचाच प्रेरणादायी प्रवास... 

2007 सालची गोष्ट.एक तरुणाने YAHOO सारख्या नामांकित कंपनीतील प्रतिष्ठित नोकरी सोडली.जगभर हिंडला.मजा केली.जीवनाचा आनंद घेतला.जेंव्हा त्याला नोकरीची गरज निर्माण झाली,तेंव्हा 2009 साल उजाडलं होतं.

त्यानं FACEBOOK सारख्या नामांकित कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला.पण,त्याला नोकरीसाठी नकार देण्यात आला.अपयश ही यशाची पहिली पायरी असते.हे तो जाणून होता.त्यानं प्रयत्न थांबवले नाहीत.त्याने TWITTER सारख्या आणखी एका नामांकित कंपनीत अर्ज केला.तिथेही पाहिल्यासारखाच अनुभव त्याच्या नशिबी आला.पण,तो खचला नाही,निराश झाला नाही,पराभूत झाला नाही. कारण,त्याचा स्वतःवर विश्वास होता.त्यानं प्रयत्न सोडला नाही.

त्याचवर्षी  त्याचा एक मित्र,एक नवा विचार घेऊन त्याच्याकडे आला.विचार होता एक मैसेजिंग अप्लिकेशन बनवण्याचा.तो विचार त्याला पटला आणि आपल्या मित्राच्या सोबतीनं,नव्या जोमाने प्रयत्नाला सुरुवात केली. थोड्यातच दिवसात त्यांनी एका अप्लिकेशनची निर्मिती केली.त्याचं नाव ठेवलं Whatsapp.जो तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या सध्या एक अविभाज्य असा घटक आहे आणि मी ज्याच्याविषयी बोलतो आहे,तो Whatsapp चा सहनिर्माता ब्रायन ऍक्टन.

2009 साली ब्रायनला Facebook कडून नोकरीसाठी नकार मिळाला.पण,त्याच Facebook ला आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी Whatsapp एक लाख कोटी रुपयांत विकत घ्यावं लागलं.ज्या Facebook मध्ये ब्रायनने नोकरीसाठी अर्ज केला होता.आज ब्रायन त्या कंपनीचा सर्वात महत्वाचा शेयरधारक आहे.म्हणूनच तो एक यशवंत आहे.

ब्रायनला दुसऱ्यांदा अपयश आलं तेंव्हा,तो जर खचला असता,नैराश्याच्या गर्तेत सापडला असता,त्यानं पराभव मान्य केला असता,तर तो आज शून्य असता.पहिल्यांदा पराभव मनात होतो,मग रणात होतो.ब्रायन यशस्वी होऊ शकला कारण, त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता.शिवाय त्याचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास होता.तेंव्हा स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि यशवंत व्हा.

ही पोस्ट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि नावासह शेयर करा.

Please Follow My Blog.

No comments: