जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की, "मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल...आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की, मला हरणापेक्षा जास्त धावावे लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन."
आपण सिंह असा किंवा हरिण, जीवनात संघर्ष काही सुटत नाही.इथे प्रत्येकाला धावावेवच लागते.
जगण्यासाठी, जगविण्यासाठी धावावे लागलेल्या एका वृद्धेची ही कथा....
ती मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या गावाची. सध्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह बारामती तालुक्यातील जळोची गावात राहणारी ही आजी.
3 विवाहित मुली,एक मुलगा आणि सतत आजारी असणारा नवरा असा परिवार.
2014 साली एक घटना घडली. नवऱ्याची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी बारामती येथील दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांच्या मतानुसार उपचारासाठी 15000 रुपये खर्च लागणार होता.घरी कमावणारा मुलगा एकटाच. आयुष्यभराची सगळी कमाई मुलींच्या लग्नात खर्च झालेली. 15000 रुपये ही रक्कम तिच्यासाठी लाख रुपयांएव्हढीच.
आता इतके पैसे उभे करायचे कसे ?याच विचारात ती आजी दवाखान्याच्या वेटिंग रूममध्ये बसली होती.डोळ्यात अश्रू आणि समोर अंधार....
तिची नजर टेबलावरील वर्तमानपत्रावरील एका बातमीवर पडली. तिच्या अंगात एक नवा जोम संचारला.
दुसरा दिवस उजाडला. आजी एका व्यासपीठाजवळ गेली. संयोजकांना विनंती केली की, "मला या धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे."
वयस्कर,नववारी लुगडं नेसलेली,कपाळावर रुपया एव्हढं कुंकू लावलेली आणि अनवाणी असलेल्या या आजीकडे पाहून सुरवातीला संयोजकांनी तिला मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करून घेण्यास नकार दिला.परंतु आजीच्या वारंवारच्या विनंती करीता तिला या स्पर्धेत सहभागी करून घेतले.
स्पर्धा सुरू झाली. एकीकडे ट्रॅक पॅन्ट आणि स्पोर्ट्स शूज घातलेली लोकं आणि दुसरीकडे अनवाणी पायाने पळणारी ही आजी. आजी जीवाच्या आकांताने पळत होती. धापा टाकत होती,पण थांबत नव्हती.
तीन किलोमीटर अंतर आजी धावली. नुसतं धावलीच नाही तर त्या मॅरेथॉन मध्ये खुल्या गटात तिने पहिला क्रमांक पटकावला...
वयाच्या 65 व्या वर्षी,नवऱ्याच्या उपचारासाठी पैसे जमविण्यासाठी जीव तोडून धावणारी,ही आधुनिक सावित्री म्हणजेच ....... लताबाई करे
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला संघर्ष हा करावाच लागतो आणि हा संघर्ष जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर करावा लागेल हे सांगता येत नाही. संघर्ष करण्याची वेळ आली तर त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता बाळगणारे यशस्वी होतात.
लताबाई करे यांचा संघर्ष देखील असाच आहे. ज्या वयात बसून खायचं असतं,त्या वयात धावावं लागलं. पण,संघर्षाच मैदान सोडून ती पळून गेली नाही.आणि म्हणूनच ती एक यशवंत आहे.
9 comments:
मित्र तुझं कार्य खूप प्रेरणादायी तू स्वतः मला एक यशवंत वाटतोस ,प्रत्येकाला आपली प्रतिभा ओळखणं जमत नाही ,ती तुला गवसली आहे ,, याचा प्रवास एक प्रतिभावंत लेखक म्हणून मला पाहायचा आहे , त्यावेळी मला ज्या भाषेत जमेल तसं मी तुझ्यावर असाच लेख लिहीन. वेगवेगळ्या विषयांवर लेखन कर वाचन प्रचंड वाढवा ,,चिंतन कर प्रत्येक पण पुस्तकांचं मग कोणताही असो तुला शुभेच्छा
छानच.तुमचे लेख असेच सुरु राहोत.तुमच्या लेखनातुन अनेकांना प्रेरणा मिळो.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया आपले नाव प्रतिक्रिया खाली लिहावे.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया आपले नाव प्रतिक्रिया खाली लिहावे.
Very nice ..sir ji
Thanks
आपले लेखन खुपच प्रेरणादायी आणि उत्सफुर्त आहे. तुम्हाला खूप खूप शुभेछा.
Thank you
खूप छान प्रेरणा देणारी माहिती असेच लिहीत राहा
Post a Comment