Friday, December 7, 2018

यशवंत–एक प्रेरणास्रोत भाग 77

एकेकाळी रोज एक डॉलर कमावणारी एक तरुणी. आज साठ हजार कोटी रुपयांची मालकीण आहे. तिचा हा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ आजच्या भागात.

एक महासत्ता असलेल्या चीनसारख्या देशातील, एका छोट्याशा खेड्यात, एका गरीब आईवडिलांच्या पोटी तिचा जन्म झाला. तिचं नाव झोऊ. झोऊच्या जन्मानंतर वडिलांना अंधत्व प्राप्त झाले आणि ती जेव्हा पाच वर्षाची झाली, तेव्हा तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. जे वय आईच्या पदराखाली हसण्या–खेळण्या–बागडण्याचं, आईशी हितगुज करण्याचं होतं, त्याचं वयात तिला आईच्या प्रेमाला मुकावं लागलं. परंतु त्या अंध पित्याने झोऊला आईची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. त्याही अवस्थेत त्यांनी तिचा आत्मविश्वास जागा ठेवला.  प्रसंगी स्वतः छोटी मोठी कामे करून तिला शिकविले. झोऊदेखील आपलं कुटुंब चालवण्यासाठी, वडीलांना मदत करण्यासाठी डुक्कर आणि बदक पाळण्याचे काम केले.

कसेबसे झोऊने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. परंतु पोट भरण्यासाठी, आपल्या अंध पित्याचा आधार बनण्यासाठी, तिने वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षण बंद थांबविण्याचा निर्णय घेतला. गावात कुठे रोजगार उपलब्ध होणार नसल्यामुळे तिने नोकरीसाठी शहराची वाट धरली. शहरात तिला तिला घड्याळाचे काच बनवणाऱ्या कंपनीत काच शोधण्याचे काम मिळाले. या कंपनीत सुरुवातीला तिला दररोज चा केवळ 1 डॉलरच पगार मिळायचा. शिकण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे, काम मिळताच तिने आपले शिक्षण पुन्हा सुरू केले. या कंपनीत तिला आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर केवळ तीनच महिन्यात प्रमोशन मिळाले. या कंपनीत तिने तीन वर्ष काम केले.

तीन वर्षाचा अनुभव आणि जवळ असलेले $3000 (तीन हजार डॉलर) च्या जोरावर 1993 साली, केवळ 22व्या वर्षी झोऊने घड्याळाचे लेंस बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली. दिवस-रात्र मेहनत घेतली. तिला  आपली कंपनी नावारूपाला आणायला 10वर्षे मेहनत करावी लागली. 2003 साल तिच्यासाठी एक नवी संधी घेऊन आले. मोटोरोला या कंपनीच्या सी.ई.ओ. नीं तिला फोन केला आणि आपल्या नव्या मोबाइलला कमी ओरखडे पडतील अशी काच स्क्रीन बनवण्याची ऑफर दिली शिवाय विनंती देखील केली.

झोऊने आलेल्या संधीचं सोनं केलं. एक नवी कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मोटोरोला कंपनीसाठी एक उत्तम प्रकारचे मोबाइल स्क्रीन तयार केले. ज्यावर खूपच कमी प्रमाणात स्क्रॅचेस पडतात. तिच्या या कामगिरीने मोबाईल जगतात हाहाकार माजला आणि नोकिया, सॅमसंग,ॲपल,एचटीसी यासारख्या दादा कंपन्यांनी तिला मोबाइल स्क्रीन बनवण्याची ऑर्डर दिली. झोऊ आता चीन मधील सर्वात श्रीमंत महिला बनली. ज्या कंपनीच्या माध्यमातून ती श्रीमंत झाली, ती कंपनी म्हणजेच लेन्स टेक्नॉलॉजी आणि  ती झोऊ म्हणजेच झोऊ क़ुएन्फ़ेइ.

झोऊ या गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या, आईविना वाढलेल्या, अंध पित्याची मुलगी आहेत. परिस्थितीला शरण जाण्यासाठी झोऊ यांना सांगण्यासाठी ही कारणे उपलब्ध होतीच. परंतु, त्यांनी कारणे सांगण्याऐवजी आपल्या आत्मविश्वासाच्या, मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि धाडसी निर्णयांच्या जोरावर साठ हजार कोटी रुपयांची मालकीण बनून,परिस्थितीला स्वतः पुढे शरण व्हायला भाग पाडले. झोऊ यांच्या दमदार कामगिरीने मोबाईल जगतात त्या “Queen Of Mobile Phone Glass”  या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.