Saturday, July 20, 2019

यशवंत-एक प्रेरणास्त्रोत भाग - 102

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 102*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

देशासाठी ऑलंपिकमधील पदक जिंकण्याचं स्वप्नं उराशी बाळगलेल्या एका फौजीची आणि त्याच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

हि कथा आहे एका फौजीची. आपल्या देशाची सेवा करता-करता तो एक उत्तम पिस्टल शुटर बनला. त्याच्या पिस्तुल चालविण्याच्या कौशल्याच्या जोरावर तो त्याच्या देशातील सर्वोत्तम शुटर बनला. 1938 साली देशांतर्गत क्रीडा स्पर्धेत केलेल्या कामगिरीने त्याने देशवासीयांची मने तर जिंकलीच, शिवाय 1940 साली होऊ घातलेल्या ऑलंपिक मधील पदकाच्या देशवासीयांच्या आशा देखील पल्लवित केल्या.

देशासाठी ऑलंपिक मधील पदक जिंकण्याचं स्वप्नं त्यानंही पाहिलं होतंच. पण, त्याच्या या स्वप्नाला अल्पावधीतच ग्रहण लागलं. 1938 सालं. त्याच्यासाठी जेवढं आनंदाचं होतं, त्यापेक्षा अधिक वेदनादायक होतं. एक दिवस आर्मी कॅम्प मध्ये त्याच्या हातात हॅण्डग्रेनेड फुटला. ज्या हातानं तो नेहमी पिस्तूल चालवायचा, त्याचा तो हात धडापासून वेगळा झाला. कायमचाच....

या सोबतच ऑलिम्पिक पदकाचं त्यानं आणि देशवासीयांनी पाहिलेलं स्वप्नंही भंगलं. कायमचंच......

आयुष्यात आलेल्या संकटांनी सर्वसामान्य माणसं गळून जातात, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देत बसतात. पण, काही माणसं आयुष्यात आलेल्या मोठ्यात मोठ्या संकटांसमोर गुडघे न टेकता, संकटालाच आपल्या समोर गुडघे टेकायला भाग पाडतात. आपले स्वप्नं पूर्ण करणारी ही माणसं सामांन्यातील असामान्य बनून जातात. हा फौजी त्यांपैकीच एक.

आपल्या समोर आलेल्या संकटांना न डगमगता तो सामोरे गेला. अपघातात निकामी झालेल्या हाताचे  दुःख करत न बसता, केवळ महिन्याभरातच त्याने आपल्या दुसऱ्या हाताने पुन्हा पिस्तुल चालविण्याच्या सरावाला सुरुवात केली. 

आपल्या बाबतीत काय घडलं आहे?? हे तो पार विसरून गेला. पण, आपल्याला काय घडवायचं आहे?? हे मात्र तो बिलकुल विसरला नाही.

आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी तो जोरदार मेहनत करू लागला. त्यानं  केवळ आपल्या स्वप्नावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं.

केवळ वर्षभरातच म्हणजे 1939 साली हा फौजी पुन्हा मैदानात उतरला. देशांतर्गत क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन, मेडल जिंकून , त्यानं देशवासीयांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीने देशवासीयांच्या ऑलिंपिक पदकाची आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली. 

पण, इतक्या लवकर मिळेल ते यश कसलं?? 1940 सालची ऑलम्पिक स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आली. 

जिवापाड मेहनत घेणारा फौजी स्पर्धा रद्द झाले म्हणून नाराज झाला नाही. त्यानं 1944 झाली संपन्न होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केलं आणि सरावाला सुरुवात केली.

पण,1944 सालची ऑलम्पिक स्पर्धाही महायुद्धामुळे पुन्हा एकदा रद्द  झाली. पण, यावेळीही तो नाराज झाला नाही. त्याने विश्रांती घेतलीच नाही.

सलग दोन वेळा रद्द झालेल्या स्पर्धा आणि फौजीचं वाढत जाणारं वय. यामुळे देशवासीयांचा विश्वास ढासळत चालला होता. पण, याऊलट येणाऱ्या असंख्य संकटांवर मात करत करत फौजी चा विश्वास वाढतच चालला होता. प्रत्येकवेळी तो पुढच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू करायचा. 


सरतेशेवटी 1948 साली ऑलिंपिक स्पर्धांचं आयोजन झालं. या स्पर्धेत फौजी ने यशाला गवसणी घातली. गेली दहा वर्षे जे स्वप्नं उराशी बाळगून तो जगत होता. ते त्याचं स्वप्नं, त्यांच्या देशवासीयांचं स्वप्नं, फौजी ने पूर्णत्वास नेलं. ऑलिंपिक गोल्ड मेडलचं स्वप्नं अखेरीस पूर्णत्वास आलं. या यशावर समाधानी राहिल तो फौजी कसला? त्याने 1952 सालच्या स्पर्धेत देखील गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. सलग दोन मेडल जिंकणारा तो एकमेव स्पर्धक बनला. तो फौजी म्हणजेच हंगेरी या छोट्याशा देशातील कॅरोली टकाक्स ( Karoly Takacs ).

कॅरोलीचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बऱ्याच समस्यांमुळे यश लवकर मिळत नाही, म्हणून प्रयत्न करणं थांबवू नये. बऱ्याचदा यश मिळवण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो.  या कालावधीत प्रयत्न करत राहणे. हाच एकमेव उपाय आपल्या जवळ शिल्लक राहतो. एकूणच काय? आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहणं, यातच यशाचं गमक आहे.

एखादी गोष्ट मिळविण्यासाठी आपण खूप मेहनत करतो, पण कधी कधी ती आपल्या हातात येता-येता राहून जाते. या सर्वांमुळे आपण निराश होऊन त्या ध्येयाला विसरून जातो, सोडून देतो. पण, या जगात अशीही काही लोकं आहेत, ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आपली स्वप्नं सत्यात उतरवली आहेत. अशी व्यक्तिमत्त्व ध्रुवाचा तारा होऊन जातात आणि आपल्या कर्तुत्वाने मृत्यूनंतर ही सदैव चमकत राहतात. त्यापैकीच एक कॅरोली आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.
 
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

2 comments:

Rohit Patil said...

कारलो takas याच्याबद्दल मीही खूप वाचलोय ध्येय आणि महत्वाकांक्षा यांना जीवनात काय महत्व असते हे त्याच्याकडून शिकलो..����

Rohit Patil said...

कारलो takas याच्याबद्दल मीही खूप वाचलोय ध्येय आणि महत्वाकांक्षा यांना जीवनात काय महत्व असते हे त्याच्याकडून शिकलो..����