Sunday, August 11, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 105

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 105*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झालेली असतानाही, अशा कठीण प्रसंगातही सकारात्मक विचार करणाऱ्या एका यशवंताचा हा प्रेरणादायी प्रवास...


11 फेब्रुवारी 1847 रोजी, तो एका यशस्वी व्यापाऱ्याच्या पोटी जन्माला आलेलं सातवं आणि शेवटचं अपत्य. वयाच्या सातव्या वर्षी पर्यंत सर्व काही ठीक होतं. पण, वडिलांना त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान सोसावे लागल्याने, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर हालाखीची परिस्थिती आली होती.

तो विक्षिप्त वागायचा. तितकाच तो बुद्धिमान होता. एका आजारात त्याच्या कानावर परिणाम झाला. त्यामुळे त्याला एका कानाने कमी ऐकू येई आणि कालांतराने कायमचे बंद  झाले. त्याच्या विक्षिप्त वागण्याने त्याला केवळ तीनच महिन्यात शाळेतून काढून टाकण्यात आले. म्हणून त्याच्या आईने त्याला घरीच शिकवायला सुरुवात केली. 


आईच्या सानिध्यात तो अध्ययन करू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याला वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड निर्माण झाली. प्रयोग करण्यासाठी त्याला पैशांची गरज वाटू लागली.तेंव्हा, वयाच्या बाराव्या वर्षी त्याने वृत्तपत्र विकायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच स्वतःच वृत्तपत्र छापायला सुरुवात केली. 

त्याने वेगवेगळी कामे केली. पण, सातत्याने प्रयोग करणे, थांबविले नाही.वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याने एक शोध लावला आणि त्याचे पेटंट घेतले. तेंव्हापासून शोध लावणे, पेटंट घेणे आणि विकणे हा त्याचा धंदाच बनला. आपल्या या प्रयोगशीलतेने त्याने स्वतःच्या जीवनात " प्रकाश " आणलाच. शिवाय, इतरांच्या जीवनातही आणला. यशस्वी होण्याचा त्याला मार्ग सापडला होता. तो आता अधिक श्रीमंत व्यक्ती झाला होता. स्वतःचा कारखाना देखील त्याने सुरू केला होता. 

1914 मध्ये म्हणजेच, वयाच्या 67 व्या वर्षी, त्याच्या कारखान्याला आग लागली. या आगीत त्याने आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक होत होती. या आगीची बातमी समजताच, त्याचा मुलगा मदतीला धावत आला. तो आपल्या मुलाला म्हणाला, "अरे पाहत काय राहिला आहेस ? जा तुझ्या आईला पटकन बोलून बोलावून आण. असे दृश्य पाहायला पुन्हा मिळणार नाही."  हे बोलणे ऐकून त्याचा मुलगा अवाक झाला. दुसऱ्या दिवशी आपल्या आशा-आकांक्षाची आणि स्वप्नांची झालेली राखरांगोळी पाहताना तो म्हणाला, " सारी सामग्री जळून नष्ट होण्याचे खूप फायदे झाले आहेत. या आगीत माझ्या असंख्य चुका जळून खाक झाल्या आहेत. आता मी नव्या जोमाने काम करायला तयार आहे." 

आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झालेली असतानाही, अशा कठीण प्रसंगातही सकारात्मक विचार करणारी ती व्यक्ती म्हणजेच थॉमस अल्वा एडिसन होय.

वयाच्या 67 वर्षी एडिसन यांचा कारखाना जळून खाक झाला. लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. पण, दुःख उगाळत न बसता. नव्या जोमाने कामाला सुरुवात करत त्यांनी अवघ्या वीस दिवसातच फोनोग्राफचा शोध लावला. संकटात खचून न जाता, पळ न काढता एडिसन यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा मार्ग निवडला. म्हणून ते आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकले. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


2 comments:

Unknown said...

Khup Chan Sandip nakkich ha blog vachun sanktala hat teklela prattek manus punha Navya umedine kamala lagel yat til Matra shankha nahi.

Unknown said...

Khup Chan Sandip nakkich ha blog vachun sanktala hat teklela prattek manus punha Navya umedine kamala lagel yat til Matra shankha nahi.