Saturday, April 4, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत वभाग - 136

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 136

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/136.html

वयाच्या 23 व्या वर्षी वैधव्य आलेल्या एका महिलेने   एक मोठं स्वप्नं पाहिलं. आपलं स्वप्नं सत्यात. उतरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महिलेचा प्रेरणादायी प्रवास आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.... चला तर मग...

भारत पारतंत्र्यात असतानाचा काळ. सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना 1943 साली,पश्चिम बंगाल मधील एका गरीब शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे तिचे कोणतंही औपचारिक शिक्षण झालं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला आणि काही वर्षातच चार मुलांची आई झाली.

घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. नवरा कष्ट करून आणायचा, तेंव्हाच घरात काहीतरी शिजायचं. अशा परिस्थितीत एके दिवशी तिचा नवरा आजारी पडला. आजरी नवऱ्याला घेऊन ती दवाखान्यात गेली. ' आधी पैसे, मग इलाज ' अशी भूमिका डॉक्टरनी घेतली. या परिस्थितीत पैसे उभे करणे, म्हणजे उभा डोंगर फोडून सपाट करण्याइतकं ते कठीण. बिचारी आपल्या नवऱ्याच्या उपचारासाठी पैसा उभा करु शकली नाही. तिचा नवरा हे जग सोडून गेला. ती विधवा झाली, त्यावेळी ती केवळ 23 वर्षांची होती. नवऱ्याच्या मृत्यूने ती केवळ दुःखी, कष्टीच झाली नाही, तर ती हडबडून गेली. घडल्या प्रसंगाने  तिच्या मनावर मोठा आघात झाला.

घडलेला प्रसंग अतिशय विदारक होता. ती विचारात पडली आणि तिने मोठा संकल्प केला, " ज्या मातीत आपल्या नवऱ्याचा शेवट झाला,त्याच मातीत एक हॉस्पिटल उभं करण्याचा."  

ज्यावेळी तिने हा "पण" केला, त्यावेळी खांद्यावर चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आणि हाती केवळ शून्य होते. तिने मोलमजुरी करायला सुरुवात केली. चार पैकी हुशार असलेल्या एका मुलाला अनाथालयात सोडलं आणि बाकीच्यांचा सांभाळ करू लागली. धुणीभांडी करणे,भाजीपाला विकणे,मजुरी करणे यासारखी कामे करून पै - पै जमा केली. थोरला मुलगा हुशार, त्याला डॉक्टर बनवायचं स्वप्नं पाहू लागली.

तब्बल 20 वर्षं आपल्या स्वप्नांसाठी खपली. 1992 साली गावात जागा खरेदी केली. 1993 साली एका ट्रस्ट ची स्थापना केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पत्र्याच्या शेडमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं. आज या हॉस्पिटलची स्वतःची तीन एकर जागा, तीन मजली इमारत आहे. शिवाय या हॉस्पिटल तिचा डॉक्टर मुलगा रुग्णाची मोफत सेवा करतो आहे. आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी ती महिला म्हणजेच सुभाषिनी मिस्त्री होय.

" केवळ पैशाअभावी आपल्या नवऱ्यावर उपचार होऊ शकले नाहीत. जे दुःख आपल्या वाट्याला आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये." याच उदात्त हेतूने प्रेरित होऊन हॉस्पिटल उभारणीचं स्वप्नं सुभाषिनी मिस्त्री यांनी पाहिलं आणि अनंत अडचणींवर मात करून ते उभं केलं. त्यांच्या या कार्याचा सन्मान भारत सरकारने 2018 सालचा पद्मश्री हा मानाचा किताब देऊन केला आहे. 

माणसाची इच्छा जर ज्वलंत असेल, तर त्या माणसाचं ठरवलेल्या ध्येयावर पोहोचणं निश्चित असतं. मग रस्त्यात कितीही अडथळे येवोत,  असंबंधित गोष्ट आहे. कुठल्याही इच्छेला ज्वलंत करण्यापूर्वी, कुठल्याही गोष्टीसाठी वेडे होण्यापूर्वी ती गोष्ट तुम्हाला खरोखरच पाहिजे आहे का ? याचा विचार करून घ्या. एकदा नाही शंभरदा. कारण, माणूस एकदा कशासाठी वेडा झाला, तर ती गोष्ट त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं सुभाषिनी मिस्त्री बाबतीत हेच घडलं. त्यांची इच्छा ज्वलंत होती. त्यामुळे त्यांचे स्वप्नं सत्यात उतरवू शकल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 आपल्या पतीसाठी, पतीच्या स्वप्नासाठी खडतर संघर्ष करणाऱ्या प्रेरणादायी महिलांचा प्रवास वाचण्यासाठी फोटो वर येथे क्लिक करा.






No comments: