Sunday, April 5, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 137

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 137

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/137.html



अनेकांना आपण कशासाठी जगत आहोत? आपण अस्तित्वात का आहोत ? हे माहीत नसते.आपण येथे का आहोत ? यावर आपण कधी गंभीरपणे विचार केला आहे का? ज्यांनी याचा गंभीरपणे विचार केला, केवळ त्याच व्यक्ती ध्येयाचा पाठलाग करण्यात यशस्वी होतात. गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या एका डॉक्टरचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग...

ही कथा आहे, पश्चिम बंगाल मधील बिरटी येथील रहिवासी असलेल्या एका सुजन ची. सुजन डॉक्टर असल्याने एका हॉस्पिटलमध्ये  नोकरी करायचे.

काही वर्षे हॉस्पिटलमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरू करण्याचा निश्चय केला आणि 1980 साली तो प्रत्यक्षात आणला. तब्बल 20 वर्षे त्यांनी स्वतःचा दवाखाना उत्तम रीतीने चालविला. वैद्यकीय व्यवसायातील कमाईने सर्व सुखसोयी पायाशी लोळण घेत होत्या. कशाचीही कमतरता नव्हती. अशातच आपण कशासाठी जगत आहोत? आपण अस्तित्वात का आहोत ? असे गंभीर विचार त्यांच्या मनात येवू लागले आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

भारत - बांगलादेश च्या सीमेजवळ असलेले सुंदरबन. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे वाघांचे अस्तित्व आहे. सन 2000 साली, सुंदरबन जवळील हिंगलगंज या अतिशय दुर्गम खेड्यात, एका चॅरिटेबल या ट्रस्ट च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यास सुजन यांनी प्रारंभ केला.

सुजन कोलकाता येथून दर शनिवारी 6 तासांचा आणि 90 किमीचा प्रवास करून हिंगलगंज या गावी जायचे आणि रविवारी दिवसभर त्या गावातील 250 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देवून संध्याकाळी घरी यायचे. वर्षभरात साधारणपणे 12000 रुग्णांना ट्रस्ट च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देतात.तेही मोफत. ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ही वैद्यकीय सेवा देण्याचे ते काम करत आहेत,त्या ट्रस्ट चे नाव आहे "सुजन". यामुळेच सुंदरबन परिसरात "सुंदरबन चे सुजन" म्हणून ते परिचित आहेत.  ते "सुंदरबन चे सुजन" म्हणजेच डॉ.अरुणोदय मंडल होय.

डॉ. मंडल यांनी गेली 20 वर्षे दुर्गम भागात निस्वार्थीपणे, अथक आणि मोफत वैदयकीय सेवा देण्याचे व्रत तडीस नेले आहे. या समाजोपयोगी कार्याचा सन्मान 2020 साली भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देवून केला आहे.

पैसा आणि पैशाने विकत घेता येतात त्या वस्तू मिळवणे, हाच अनेकांच्या जीवनाचा मुख्य उद्देश असतो. काहींचे जगात नाव कमावण्याचे ध्येय असते तर, काहींचे आपली कलाकौशल्ये पूर्णत्वास नेण्याचा उद्देश असतो.असेही काही लोक असतात ज्यांचा उद्देश आहे इतरांना मदत करणे. सर्व सुखसोयी उपलब्ध असताना, आपल्या जन्माचे साध्य काय आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न डॉ. मंडल यांनी केला. सरतेशेवटी त्यांना त्याचे ध्येय सापडले आणि साध्य करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांच्या याच धडपडीने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या याच धडपडीने त्यांना पद्मश्री बनविले म्हणूनच आज ते एक यशवंत आहेत.


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.


🎯 डॉ. तात्याराव लहाने यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/4.html

No comments: