Friday, April 17, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 149

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 149

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/149.html

एक सामान्य "शेतकरी ते पद्मश्री" असा प्रवास असणाऱ्या एका अपंग शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग..

गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील सरकारी गोलिया गावात एका गरीब अडाणी शेतकरी कुटुंबात गेनाचा जन्म झाला. सर्व भावंडात सर्वात लहान असलेला गेना जन्मतः पोलिओसारख्या असाध्य व्याधीने ग्रासला होता. त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. त्यामुळे त्याला तीनचाकी सायकलीचा आधार घ्यावा लागला. घरची परिस्थिती बेताची, शिवाय वडील अशिक्षित असल्याने,त्यांनी गेना व्यतिरिक्त इतर मुलांना शिकवण्याऐवजी शेतीतच मदतीला घेतले. गेनाची शेतीच्या कामी कोणतीच मदत होणार नसल्यामुळे, त्याला एका हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी पाठवले. परंतु, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी न पाठविता, गावी परत आणले.

आपण शेतात कोणतीही मदत करू शकणार नाही. याची जाणीव होती. तरीही गेना कुटुंबियांसोबत दररोज शेतात जायचा व थोडीफार मदत करायचा. काही दिवसानंतर आपण ट्रॅक्टर चालवण्याचे काम करू शकतो. असा विश्‍वास त्यांच्या मनी निर्माण झाला. तो ट्रॅक्टर शिकला. क्लच आणि ब्रेक हाताने नियंत्रित करण्याचे तंत्र तो शिकला. कालांतराने शेतातील काही त्रुटी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करतात. वर्षभर शेतात राबतात. पण, तुटपुंजे उत्पन्न मिळते. याची त्यांना जाणीव झाली. "आपण अपंग आहोत. त्यामुळे एकदा लावले की, दीर्घकाळ त्याचे उत्पादन घेता येईल. असे पीक शोधले पाहिजे." याची त्याला जाणीव झाली. त्याची शोधा-शोध सुरू झाली. अभ्यास सुरू झाला. दौरे सुरू झाले. शेवटी तो महाराष्ट्रात आला. दोन्हींकडील हवामानाची सांगड घातली आणि डाळिंब पिकाची निवड केली.

हे सारे करत असताना कित्येक लोकांनी त्याला वेड्यात काढले. या जिल्ह्यात आजवर असे धाडस कोणी केले नाही. असेही कित्येकांनी सुनावले. पण, स्वतःवर विश्वास असणारी माणसं कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. गेना त्यांपैकीच एक होता. त्याने मनाचेच करायचे ठरविले. त्याने डाळिंब लागवड केली. बाग फुलविली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. जी लोकं त्याच्यावर हसत होती,त्याला वेडा ठरवीत होती, तिचं लोकं डाळिंब लागवड करण्याबाबत त्याचे मार्गदर्शन मागू लागले. त्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे उत्पन्न वाढविले. त्यामुळेच तो परिसरात "अनार दादा" म्हणून प्रसिद्ध झाला. तो "अनार दादा" म्हणजेच "गेनाभाई दर्गाभाई पटेल होय."

स्वतः अपंग असून शेतीत सुधारणा करण्यावर गेनाभाई यांनी भर दिला. अशा वेळी खूप त्रास झाला, लोकांकडून खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. पण, तरीही त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. अत्यंत धाडसाने, जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी आपले स्वप्नं सत्यात आणले. 
"मंजिलें उन्ही को मिलती है, 
जिनके सपनों में जान होती है,|
पंखो से कुछ नहीं होता 
हौसलों से उडान होती है |"
या ओळी गेनाभाई यांच्या आजवरच्या प्रवासाला चपखल बसणाऱ्या आहेत. 

गेनाभाई यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"ॲम्बुलन्स दादा"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/148.html

No comments: