Thursday, April 16, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 148

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 148.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/148.html


दुःख,समस्या,अडचणी प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात. काहीजण त्याला शरण जातात आणि काहीच त्याच्यावर मात करून पुढे जातात, तर काहीजण अशा प्रकारचे दुःख,समस्या,अडचणी इतरांच्या वाट्याला येऊच नयेत. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करतात आणि हेच लोक खऱ्या अर्थाने यशवंत असतात. जे आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणारा आणि आपलं सर्वस्व खर्ची करणार्‍या एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास, आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

दादा. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धालाबाडी या दळणवळणाची साधनं आणि वैद्यकीय सोयीसुविधांची उपलब्धता नसलेल्या दुर्गम खेड्यात राहणारा एक सर्वसामान्य इसम. तो चहाच्या मळ्यात मजुरी करून आपले पाच जणांचे कुटुंब चालवायचा.

मिळणाऱ्या उत्पन्नातून आनंदी जीवन जगणाऱ्या दादाचे आयुष्य 1995 साली घडलेल्या एका घटनेने पारच बदलून गेले. एके दिवशी मध्यरात्री दादाच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गावात कुठल्याच प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. गावापासून 50 किमी दूर अंतरावर दवाखाना होता. आईला दवाखान्यात नेण्यासाठी, तिला वाचविण्यासाठी तो धावाधाव करू लागला. दारोदार हिंडून मदतीची याचना करू लागला. ज्यांच्याकडे वाहन होते, त्यांना विनवणी करू लागला. पण, त्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. शेवटी नको तेच झालं. आईचे निधन झाले. घडलेल्या घटनेने दादा खूपच दुःखी व कष्टी झाला. त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. 'जे आपल्या आईच्या बाबतीत घडले, ते इतरांच्या बाबतीत घडू नये. यासाठी आपण काहीतरी करायचे.' असे त्याने मनोमन ठरविले.

काही वर्षं सरली. 1998 सालं उजाडलं. एकेदिवशी शेतात दादाच्या एका सहकारी मजुराचा अपघात झाला. त्याला ताबोडतोब दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. जवळ कोणतेही चारचाकी वाहन अथवा ॲम्बुलन्स नव्हती. त्यामुळे त्याला दवाखान्यात कसे घेवून जायचे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मळ्याच्या मॅनेजरकडे असलेल्या दुचाकीवर, पाठीमागे सहकारी मजुराला बसवून त्याला स्वतःच्या पाठीला एका कापडाच्या साहाय्याने बांधून दवाखान्यात घेऊन गेला. सहकाऱ्यावर वेळेवर उपचार झाले. तो बचावला आणि लवकर बरा झाला.

घडल्या प्रकाराने एक गोष्ट दादाच्या लक्षात आली. ती म्हणजे दुचाकीने ॲम्बुलन्सचे काम केले आहे. आपण दुचाकीचा वापर ॲम्बुलन्स म्हणून करू शकतो. याची त्याला जाणीव झाल्याने, कर्ज काढून त्याने एक दुचाकी खरेदी केली आणि त्या दुचाकीचा वापर ॲम्बुलन्स म्हणून करू लागला. परिसरातील वीस गावातील लोकांना थंडी असो, ऊन असो वा पाऊसात 24 तास कधीही रुग्णांना निशुल्क दवाखान्यात पोहोचवण्याचे काम दादा आपल्या ॲम्बुलन्स दुचाकीवरून करू लागला. त्याच्या या कामामुळे तो परिसरात "ॲम्बुलन्स दादा" म्हणून प्रसिद्ध झाला. तो "ॲम्बुलन्स दादा" म्हणजेच "करिमुल हक" होय.

ॲम्बुलन्स दादा यांचा प्रवास वाचून झालाचं असेल. तर पुढील प्रश्न वाचा. 
तुमच्या जीवनात दुःख आहे का ? 
समस्या आहेत का ? 
अडचणी आहेत का ?  सगळ्यांची उत्तरे हो अशीच  असतील. आता पुढचे प्रश्न. 
तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे का ?
तुमचे ध्येय साध्य करायचे आहे का ? 
मग दुःख, समस्या, अडचणी यांचं काय करणार ?
त्याला शरण जाणार ? की मात करणार ? की आणखी काय ?? तुम्ही कोणता मार्ग निवडणार? यावर तुमचं यश अवलंबून आहे. याची आपणांस जाणीव असावी

गेली दोन दशकं, 5000 हून अधिक रुग्णांना, स्वतः अत्यंत गरिबीत असताना, परिसरातील रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याचे काम ॲम्बुलन्स दादा अगदी मोफत करत आहेत. ''जे दुःख, समस्या, अडचणी आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये." यासाठी पर्यायी व्यवस्था ॲम्बुलन्स दादा यांनी  उभी केली आहे. त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"मरियप्पन थंगवेलू"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/147.html

No comments: