Sunday, May 30, 2021

माझ्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलणाऱ्या, माझ्या ध्येयहीन जीवनाला ध्येयानं प्रेरित करणाऱ्या एका अवलियाची गोष्ट

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *माझ्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलणाऱ्या, माझ्या ध्येयहीन जीवनाला ध्येयानं प्रेरित करणाऱ्या एका 'अवलियाची' गोष्ट....*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

2003 साली मी दहावी उत्तीर्ण झालो. विज्ञानची आवड नसल्याने, वाणिज्य शाखेला प्रवेश घेण्याचं ठरविलं. पण, माझ्या हलगर्जीपणामुळे फॉर्म भरण्यासाठी उशीर झाला. तेंव्हा सांगलीतील के.डब्लू.सी.,जी.ए. सारख्या नावाजलेल्या कॉलेज मधील प्रवेश फुल्ल झाले होते. शेवटी के.डब्लू.सी. येथे नोकरीस असलेले आमच्या गल्लीतले श्री.महावीर वाडकर आणि श्री.संजय कोळी यांनी मला सांगली हायस्कूलला नेलं आणि माझी भेट एका प्राध्यापकांशी करून दिली. पुढे जाऊन ही प्राध्यापक असणारी व्यक्ती माझं आयुष्य बदलून टाकणारा अवलिया बनेल. याची मला किंचितही कल्पना नव्हती.


माझे मार्क लिस्ट पाहून त्या प्राध्यापकांनी ऍडमिशन फॉर्म दिला. मेरिट लिस्ट लागली. पहिल्या यादीत स्थान मिळाले. ऍडमिशन पक्क झालं. कॉलेज सुरू झालं. मी दहावीनंतर मार्केट यार्डमध्ये दिवाणजी म्हणून नोकरी पकडली होती. सकाळी 7 ते 11 कॉलेज आणि नंतर काम. अशी माझी दिनचर्या होती. अकरावीला माझा 'फोकस' फक्त कामावर होता. तरीही अकरावी पास झालो. पण यावर माझा विश्वासच बसत नव्हता. 

बारावीत गेलो. ते प्राध्यापक माझे वर्गशिक्षक बनले. पण, अजूनही गंभीर नव्हतो. शिवाय कामामुळे जेमतेमच अभ्यास करत होतो. अशातच, कॉलेजने 'टॅलेंट बॅच' ची निर्मिती केली. त्यात माझी निवड झाली. सराव चाचण्या होऊ लागल्या. बॅच मध्ये निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात कमी गुण मलाच मिळू लागले. माझी ही 'प्रगती' पाहून एकदिवस वर्गशिक्षकांनी मला स्टाफरूममध्ये बोलावलं. माझ्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली आणि मला म्हणाले, "मोठं काहीतरी करायचं असेल, तर नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष दे." हा क्षण माझ्या आयुष्याचा 'टर्निंग पॉईंट' ठरला. त्या दोन वाक्यांनी काळजात घर केलं. नोकरी सोडली. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. झपाटून, दिवस रात्र जागून अभ्यास केला. परीक्षा झाली. निकाल लागला. वर्गशिक्षक मार्कलिस्टचे वाटप करत होते. मी मार्कलिस्ट हाती घेतघेतंच, त्यांना प्रश्न केला. "सर, पहिला नंबर कोणाचा आला ? " आनंदून ते म्हणाले, "संदिप तुझाच !" मी वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. माझ्या आयुष्याचा नवीन दिशा मिळाली. पुढे डी.एड.करून प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळवली. आज 12 वर्षे सेवा पूर्ण करून यशस्वी जीवन जगतो आहे. माझ्या आयुष्याची दशा आणि दिशाच बदलणारे ते प्राध्यापक म्हणजे श्री.पिंपळ रामचंद्र कांबळे अर्थात पी.आर.कांबळे सर होय. ते मला सहकार आणि व्यापार संघटन हे विषय शिकवायचे. 

श्री.कांबळे सर एक हुशार, बोलकं, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, लोकशाही तत्वांचा अवलंब करणारं, सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण नातं जपणारं, प्रभावी, संयमी अन् निस्वार्थी असं व्यक्तिमत्त्व. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नाईट कॉलेजमधून शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज सांगली हायस्कूलच्या उपप्राचार्य पदापर्यंत येऊन थांबला आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर आहे. 

अलकुंड(एस) ता.कवठे महांकाळ या छोट्याशा खेडेगावात, एका गरीब कष्टकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. मोठं कुटुंब. घर म्हणजे खपली, उसाच्या पाल्यांनी शाकरलेली झोपडीच. पावसाळ्यात होणारी दैना विचारायलाच नको. वडिलांची शांत, संयमी आणि कष्ट करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी आली. लहानपणापासून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना कष्टच करावं लागलं. बलुतेदारी पद्धतीचा फटाकाही सहन करावा लागला. नको ती कामं अगदी बालवयात करावी लागली. 

शाळेत जाण्यायोग्य झाल्यावर, शेजारच्याच कोणीतरी त्यांचं नाव शाळेत दाखल केलं. सातवी पर्यंतच शिक्षण गावातंच झालं. पुढे, कासेगाव ता.वाळवा येथील आझाद विद्यालयात 12 वी पर्यंतच शिक्षण, सर्वोदय वसतिगृहात राहून पूर्ण केलं. इथं स्व.राजाराम बापूंच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. त्याच्या विचाराचा मोठा प्रभाव सरांवर पडला. आष्टा, ता.वाळवा येथील आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये "कमवा अन् शिका" योजनेत काम करून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे जी.ए.कॉलेज सांगली येथे M.com साठी प्रवेश घेतला. "सांगलीनं सरांचं चांगली केलं.पण, परिक्षा घेऊनच." आर्थिक चणचणीने इथेही पाठ सोडलीच नाही. म्हणून, त्यांनी संकटांना पाठ दाखविली नाही. ते खचले नाहीत.ते परिस्थितीशी लढले. त्यांनी हात चालवले. यावेळी, मात्र खुरप्या ऐवजी पार हाती घेतली. संकटांच्या दगड खाणीत, यशाच्या कोहिनूर शोधण्यासाठी पारीचा घाव घालायला सुरुवात केली. हाताला फोड आले. अनेक अपमान झाले. पण, मार्गातील अडथळा दूर केलाच. सरतेशेवटी त्यांच्या संघर्षासमोर संकटांनी मान टाकली. 2 जुलै 1986 रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमधील त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. 

तब्बल 35 वर्षे अथक परिश्रम घेवून,आपल्या बुध्दीकौशल्याच्या जोरावर, अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित, सांगली हायस्कूलच्या यशाची कमान सतत उंचावत ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लिलया पेलले. त्यामुळेच, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीत श्री.पी.आर.कांबळे हे नाव नेहमी अग्रभागी असतं. 

अनेकांच्या जीवनाला आकार देवून, त्यांना मार्गावर आणणारे पी.आर.कांबळे सर हे माझ्यासाठी दैवतच आहेत. ते 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

श्री.पी.आर.कांबळे सर यांचा संपर्क क्रमांक - 9420715710

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

*धन्यवाद...*




1 comment:

Chandrakant Ainapure said...

Nice article Sandeep Patil sir. In same junior college I am working as assistant teacher of P R Kamble sir in Science wing for last 19 years.