Monday, November 12, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 28

एका तरुणाला आईवडील आणि पत्नी त्याच्या आजारपणामुळे डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर आवश्यक त्या सर्व तपासण्या करतात आणि त्या कुटुंबाला सांगतात कि, "हा तरुण फारफार तर दोनच वर्षे जगू शकेल. दोन वर्षापेक्षा जास्त हा जगूच शकणार नाही." पुढे त्या तरुणाचे काय झालं???? तो दोन वर्षे तरी जगला काय??? तो यशवंत कसा बनला??? तो यशवंत कोण???
फार वेळ तुमची उत्सुकता ताणून धरणार नाही. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया...

तो लहानपणापासूनच हुशार,बुद्धिमान.
त्याचे मित्र त्याला गंमतीने आइन्स्टाइन म्हणायचे. ते ही योग्यच होते म्हणा. कारण, त्याचा IQ 160 होता. त्याची आणि गॅलिलिओची जन्मतारीख एकच. 8 जानेवारी. हा एक योगायोगच.

वयाच्या 21व्या वर्षी त्याला एक भयंकर रोग झाला. जो कधीच बरा होऊ शकणार नव्हता. डॉक्टरांनी फक्त तो दोन वर्षाचाच पाहुणा असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसला. पण,त्यातून तो सावरला. 2 नाही, 20 नाही तर 50 वर्षे जगणारच. असं त्यानं आपल्या मनावर बिंबवलं.

कालांतराने, त्या रोगाने संपूर्ण शरीरावर ताबा मिळविला. शरीरावरील नियंत्रण सुटत चालले होते. नीट उभं राहता येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. आता त्याने व्हीलचेयर चा आधार घेतला. पण, तो मनाने डगमगला नाही. खचला नाही.

याच कालावधीत, त्याने फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयात पदवी मिळवून P.Hd देखील मिळविली आणि तो एक शास्त्रज्ञ बनला. त्याने ब्लॅक होल्स मधून निघणाऱ्या रेडिएशनवर संशोधन केले. ब्लॅक होल्स मधून निघणाऱ्या रेडिएशन्सला त्याचे नाव दिले ' हॉकिंग रेडिएशन्स ' आणि तो शास्त्रज्ञ म्हणजेच डॉ.स्टीफन हॉकिंग. वय वर्षे 76 नाबाद. (हा लेख लिहण्यापूर्वी डॉ. हॉकिंग हयात होते.14 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले.)

डॉ.स्टीफन हॉकिंग हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे कारण, शरीर साथ देत नसताना देखील त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता आणि दुर्दम्य इच्छा शक्तीमुळे सारं जग त्यांच्यापुढे झुकतं. म्हणूनच ते मला यशवंत वाटतात.

आपल्या अवतीभवती अपयशाने, रोगाने, कर्जाने, प्रेमभंगाने खचलेले कितीतरी तरुण आपल्याला पाहायला मिळतील. त्या सर्वांसाठी डॉ.स्टीफन हॉकिंग हे एक आदर्श असे व्यक्तिमत्त्व आहे.

संकटांच्या जाळ्यात अडकून नकारात्मक दृष्टिकोनातून मृत्यूची वाट पाहत बसण्यापेक्षा, जीवन जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर संकटांचा स्वीकार करून, आपण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी एक उद्देशपूर्ण जीवन जगू शकतो. हा संदेश आपल्याला डॉ.स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनातून मिळतो.


1 comment:

sonudeore21@gmail.com said...

खूपच सुंदर