Wednesday, November 21, 2018

यशवंत – एक प्रेरणास्रोत भाग 74

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 74*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/74.html

*2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातल्या एका तरुणीने 773 वा क्रमांक पटकावला. तिला रेल्वे मध्ये नोकरी मिळाली. पण,भारतीय रेल्वे मंत्रालयाने तिला नोकरी देण्यास नकार दिला. रेल्वे मंत्रालयाने नकार देण्यामागचे कारण काय असावे ? ज्या तरुणीवर हा अन्याय झाला, ती तरुणी कोण ? न्याय मिळविण्यासाठी तिला कोणता संघर्ष करावा लागला ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.*

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील वडजी या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. आईवडील नोकरीच्या निमित्ताने उल्हासनगरला ठाणे येथे स्थायिक झाले होते. त्यामुळे तिचे बालपण उल्हासनगरमधेच गेले. लहानपणापासूनच तिची नजर कमकुवत होती. वयाच्या बारा वर्षापर्यंतच ती पाहू शकेल. असा अंदाज डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितला होता. पण,वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या वर्गमित्राने डोळ्यावर पेन्सिल मारली आणि तिचा एक डोळा कायमचा निकामी झाला. 

वयाच्या सातव्या वर्षी ती आजारी पडली आणि या आजारपणातच तिचा दुसरा डोळाही कायमचा निकामी झाला. ती ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेने तिच्या अंधत्वामुळे तिचा प्रवेश कायम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तिला घरापासून दूर, दादरच्या एका अंध विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि घरापासून दूर होस्टेलमध्ये राहावे लागले. दहावीचं वर्ष तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. या वर्षी तिने कधी नव्हे तो खूप अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी पास झाली.

अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने उल्हासनगर येथेच घेतले. बारावीला भरपूर परिश्रम घेतले. कॉलेजमध्ये तर ती पहिली आलीच शिवाय जिल्ह्यातही पहिली आली. पुढे तिला झेवियर्स कॉलेजला प्रवेश घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिने प्रवेश घेतला सुद्धा. उल्हासनगर ते सीएसटी ती दररोज लोकल ट्रेनने एकटीच प्रवास करायची. "तू अंध आहेस. तुला दिसत नाही. तुला घराजवळच्या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. एवढ्या लांबचा प्रवास करायची काय गरज आहे ?" तिच्यासोबतचे डोळस लोक तिला असे विविध प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. पण, ती या प्रश्नांना दाद द्यायची नाही. मुंबई युनिव्हर्सिटीत राज्यशास्त्र मध्ये ती पहिली आली आणि ती करत असलेल्या प्रवासाचे सार्थक झाले. आता तिने जे.एन.यु. दिल्ली या युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षणासाठी अर्ज केला. यासाठी तिने प्रवेश परीक्षा दिली,मुलाखत दिली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. आता तिला घरापासून पाच दहा किलोमीटर नव्हे, तर हजारो किलोमीटर दूर दिल्लीला जाऊन राहावे लागले. ते ही एकटी. तिथे तिने एम.फिल आणि पी.एच.डी. सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. याच कालावधीत तिचे लग्न झाले. परंतु, तिच्या पतीने शिक्षण सुरू ठेवण्याची अट घातली. त्यामुळे तिने आपले शिक्षण सुरूच ठेवले. 

2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात तिने 773 वा क्रमांक पटकावला. इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस मध्ये तिला नोकरीसुद्धा मिळाली. पण, तिचा आनंद फार काळ टिकला नाही. रेल्वे मंत्रालयाने तिच्या अंधत्वाचे कारण पुढे करत, तिला नोकरी नाकारली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. परंतु, ती या धक्क्यातून लवकरच सावरली. पुन्हा जोमाने तयारीला लागली. 2017 साली पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी तिने जबरदस्त कामगिरी करत देशात 124 वा क्रमांक पटकावला आणि ती बनली *भारतातील पहिली अंध जिल्हाधिकारी. ती फर्स्ट लेडी म्हणजेच प्रांजल पाटील.*

*प्रांजली पाटील यांचा प्रवास अतिशय खडतर असा आहे. "त्यांचा प्रवास सहज सोपा होता, त्यांना नशिबाची साथ होती." यासारखी वाक्यं त्यांच्या बद्दल कोणीच काढणार नाहीत. त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. स्वतः शी लढता लढता समाजाशी लढणं सोपं नसतं. डोळस व्यक्तीला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कैकपटीने अधिक वेळ अंध व्यक्तींना लागतो. याची आपल्याला जाणीव असेलच. अनेक समस्यांवर मात करत सौ. प्रांजल पाटील यांनी मिळवलेले यश डोळे दिपवणारे आहे. अंधत्वावर मात करून दुर्दम्य इच्छाशक्ती,आत्मविश्वास आणि परिश्रमाने प्रांजल पाटील यांनी मिळवलेले यश, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी तर आहेच. शिवाय तो, डोळे असूनही स्वप्नं न पाहणाऱ्या, प्रयत्न न करणाऱ्या अंधासाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



2 comments:

Shabdprasad said...

प्रांजल पाटील एक अंध स्त्री, तिची धडपड, सर्व डोळस विद्यार्थ्यांना एक दिशा दाखवणारी ,प्रेरणादायी आहे. तिच्या या कर्तुत्वाला, प्रसाद मेहता सांगली, परिवाराचा विनम्र सलाम! तुम्ही तुमच्या ब्लॉगवर अशा कर्तृत्ववान व्यक्ती निवडून त्यांना जगापुढे सादर करता ही ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे,धन्यवाद.
आपण माझ्या ब्लॉगला भेट देऊन माझा गाव याचा प्रयत्न जरूर जरूर पहावा ही विनंती.shabdprasad.blogspot.com site:shabdprasad.blogspot.com

Unknown said...

I am proud of her, she is a daughter of my member of staff Sh. Laxmikant Patil Engineer at DOORDARSHAN Badlapur. I appreciate him as asuccessfull parent as he developed her motivated & facilitated her to reach her at this height