Thursday, December 20, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 90

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 90*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

काही वर्षांपूर्वी #MeToo (HashtagMeToo) या चळवळीने संपूर्ण भारतभर जोर धरला होता. या चळवळीच्या माध्यमातून अनेक पीडित महिला सेलिब्रिटींनी आवाज उठविला. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, या चळवळीची सुरुवात कधी झाली ? कोणी केली?? ही चळवळ सुरू करण्यामागची प्रेरणास्त्रोत असलेल्या महिलेची ही संघर्षमयी कथा...

12 सप्टेंबर 1973 रोजी तिचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे, एका गरीब आणि मजूर असलेल्या कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिचे शारीरिक शोषण होऊ लागले. ती पंचवीस वर्षाची होईपर्यंत हे सुरूच होते. यातूनच तिने 1998 साली, एका मुलीला जन्म दिला. या संपूर्ण प्रसंगात तिला तिच्या आईने शक्ती दिली. शिवाय, समाजात वावरण्याची प्रेरणा दिली. आईच्या दिलासादायक शब्दांनी ती प्रेरित झाली आणि जगातील इतर महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, शारीरिक शोषण यावर वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे तिने ठरवले. 2003 साली महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निवारणासाठी, तिने Just Be नामक सेवाभावी संस्था सुरू केली. 

2006 साली या संस्थेच्या कामानिमित्त ती एका कॅम्पमध्ये गेली. तिथे अनेक मुली, तरुणी होत्या. सर्वांशी तिचा संवाद सुरू होता. एका तेरा वर्षाच्या मुलीवर तिची नजर खिळली. तिच्याजवळ जाऊन आपुलकीने चौकशी केली. तेव्हा, त्या तेरा वर्षाच्या मुलीने सांगितले की, गेली कित्येक वर्षे तिच्या आईचा बॉयफ्रेंड, तिच्यावर बलात्कार करतोय. तिला कसल्याही प्रकारचा प्रतिकार करता येत नसल्याची, आवाज उठविता येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. त्या तेरा वर्षाच्या मुलीचा हृदय पिळवून टाकणारा किस्सा ऐकल्यावर तिच्या ओठांवर तुझे शब्द आले आणि ते म्हणजे _MeToo._ 


याच वर्षी तिने मायस्पेस या वेबसाईटवर सर्वप्रथम _MeToo_  चा वापर करून महिलांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, अशा महिलांना सहानुभूती मिळवून देण्यासाठी, खासकरून तरुण आणि असुरक्षित स्त्रियांना सशक्त करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले. ज्यामुळे एक सशक्त चळवळीचा उदय झाला. ज्या महिलेने या चळवळीची सुरुवात केली, ती महिला म्हणजेच _*टराणा बुर्के*_ होय. 

जीवनात संकटांची मालिका आपल्या समोर उभी राहते, या संकटाला घाबरून आपण पळ काढतो. पण, ही संकटं आणखीनच घाबरवतात. तसचं, अन्याय करणाऱ्याला घाबरलं की, तो आणखी अन्याय करतात. परंतु, हा अन्याय आपण आयुष्यभर सहन करायचा का ? कधी ना कधीतरी या संकटांना सामोरं गेलंच पाहिजे. तरच ही संकट आपल्याला घाबरून पळ काढतील.

संकटाविरोधात, अन्याय- अत्याचाराविरोधात उभं राहण्याची, आवाज उठवण्याची प्रेरणा टराणा बुर्के   यांच्या जीवन प्रवासातून मिळते. टराणा यांच्या धाडसी निर्णयामुळे, अनेक महिलांना आपल्यावरील अन्याया विरोधात खुलेआमपणे बोलण्याचे धाडस निर्माण केले आहे. टराणा बुर्के यांच्या कार्याची दखल टाइम्स मासिकाने 2017 साली त्यांचा ' पर्सन ऑफ द ईयर ' ने सन्मानित केले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!




1 comment:

aryan said...

खूप छान व सखोल माहितीचे भंडार म्हणजे आपला ब्लॉग.