Sunday, August 4, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 104

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 104*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

जन्मतःच केवळ दोन किलो वजन असलेल्या, काही दिवसातच नऊ रोगांनी ग्रासलेल्या आणि अर्धांगवायूने डावा पाय निकामी झालेल्या आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ती तिचा डावा पाय कधीच जमिनीवर टेकू शकणाऱ्या, एका मेहनती, जिद्दी महिलेची ही संघर्षमय कथा...

23 जून 1940 रोजी अमेरिकेतील, टेनेसी राज्यातील एका कृष्णवर्णीय कुटुंबात, गरीब माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेले 20 वे अपत्य म्हणजे ती. तिचा जन्म वेळेआधीचा म्हणजेच 9 महिने पूर्ण होण्याआधी झालेला. तिच्यासह कुटुंबात एकूण 22 भावंडे होती.

वडील हमाली करायचे तर, आई लोकांकडे साफ सफाई ची कामे करायची.

इतक्या प्रतिकूल परिस्थिती असलेल्या कुटुंबात, ती लहानाची मोठी होत होती.

वेळेपूर्वी झालेला जन्म आणि कमी वजन असल्यामुळे, काही दिवसातच तिला अनेक रोगांनी ग्रासले. यातच तिला अर्धांगवायू झाला आणि तिचा डावा पाय निकामी झाला. ती तिचा डावा पाय जमिनीवर कधीच शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले," तिला नेहमी कुबड्यांच्या साहाय्यानेच चालावे लागेल."

पण, हे ऐकून तिची आई मुळीच डगमगली नाही. शिवाय, ती स्वस्थ ही बसली नाही. अशा बिकट परिस्थितीत आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिनेच मुलीचे मनोधैर्य वाढविले.

तिने उपचारासाठी अनेक दवाखाने पालथे घातले. एका दवाखान्यातील डॉक्टरांनी " मुलगी चालू शकेल." असा विश्वास दिला. तेव्हा सलग दोन वर्षे, आठवड्यातून दोनदा, 80 किमी चा प्रवास करून ती माऊली मुलीच्या उपचारासाठी दवाखान्यात जाऊ लागली. 

आईची धडपड त्या नऊ-दहा वर्षाच्या मुलीचे मनोबल उंचावत होते. ती लोखंडी पट्ट्यांच्या आधारे चालण्याचा, धावण्याचा अधिक तीव्रतेने सराव करी. तीव्र वेदना सहन करी. अनेकदा जमिनीवर पडायची. पण, चालणे थांबवायची नाही.  कोणी तिची टिंगलटवाळी केली, तरीही ती प्रयत्न करणे थांबवित नव्हती. 

आईची धडपड फळाला आली आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्या मुलीने कुबड्यांना कायमचा रामराम करून स्वतःच्या पायावर उभी राहिली. 

आता तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिने एक धावपटू होण्याचे स्वप्नं पाहिले आणि ती तयारीला लागली देखील. ती तेराव्या वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धात सहभागी होऊ लागली. 

वयाच्या पंधराव्या वर्षी तिने टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. येथे तिला एड टेम्पल नावाचे प्रशिक्षक भेटले. तिच्यातील जोश आणि जिद्द पाहून, त्यांनी तिला प्रशिक्षण दिले.

तिच्या प्रयत्नांना आणि जिद्दीला यश आले. 

वयाच्या 16 व्या वर्षी म्हणजेच 1956 साली मेलबर्न येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला अमेरिकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मिळाली म्हणण्यापेक्षा, तिने ती आपल्या कर्तृत्वाने मिळविली. धावण्याच्या शर्यतीत तिने ब्रांझ पदक मिळवून स्वतःला सिद्ध केले. 

एवढंच नव्हे तर 1960 सालच्या ऑलिम्पिकमध्ये  तिने तीन सुवर्णपदके जिंकली. तीन सुवर्णपदके जिंकणारी ती अमेरिकेची पहिली महिला म्हणजेच विल्मा रुडॉल्फ होय.

कित्येकांनी तिच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले. कित्येकांनी चुकीची माहिती दिली. कित्येकांनी तिची टिंगलटवाळी केली. म्हणून 
ती जर जागेवर खिळली असती तर.....? 
किंवा आपल्या आजरापणाला घेवून बसली असती तर....? कदाचित विल्मा रुडोल्फ हे नाव इतिहास न बनता, इतिहास जमा झाले असते.
पण, असे झाले नाही. कारण, विल्मा ठाम राहीली. 

ज्यांचे ध्येय व स्वप्नं ठरलेले असते आणि मनी जिद्द असते. अश्या व्यक्तीला आपले ध्येय आणि स्वप्नं पूर्ण करण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही. म्हणून जे काम तुम्ही हाती घेतले ते पूर्ण करण्याकरीता सर्व शक्तिनिशी प्रयत्न करावा. अपयशाची भीती सुद्धा जवळ येवू देवू नका. केवळ यशाचा आणि यशाचाच विचार करा. तुम्ही जसे तुम्हाला पाहता, तसेच तुम्ही घडत जाता.

परिस्थिती कशी ही आली तरी तिच्यावर मात करण्याची हिंमत अंगी असणे आवश्यक आहे. विल्मा रुडोल्फ कडे ती हिंमत होती. म्हणूनच ती यशस्वी होऊ शकली. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!






1 comment:

Ranju said...

I read so many such stories posted by you .....so nice..it help me to creat positive energy. Realy nice collection...