Sunday, September 8, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत -भाग - 109

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 109*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

44 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. एका कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
त्यावेळी चाहत्यांनी त्या कलाकाराला ऑस्करच्या इतिहासातले सगळ्यात मोठे Standing ovation दिले. सतत 20 मिनिटं, लोकं उभे राहून, टाळ्या वाजवून त्याचा गौरव करीत होते. त्याला पुरस्कार दिला जात असताना, त्याने पुरस्कार स्वीकारल्यावर आभार व्यक्त करतानाही ते सतत उभेच होते. त्या कलाकाराचा संघर्ष आणि त्याच्या प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

16 एप्रिल 1889. इंग्लंड मधील अनिर्बंध जुगार, वेश्याव्यवसाय आणि दारूच्या अड्ड्यानी वेढलेल्या भागात, एका म्युझिक हॉलमध्ये ओपेरा गायक म्हणून काम करणाऱ्या मातापित्यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. ते ज्या परिसरात राहायचे त्या परिसरातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम त्या दोघा माता-पित्यांना वर झाला. सहाजिकच ते दोघेही अत्यंत व्यसनी बनले.

अतिरिक्त मद्यपानाने त्याच्या आईचा आवाज गेला. त्यामुळे तिला काम मिळेनासे झाले. स्वतः जगण्यासाठी आणि मुलांना जगविण्यासाठी , कधी ती नर्स झाली तर कधी तिने कपडे शिवण्याचे काम केले. प्रसंगी तिला देहविक्री सुद्धा करावी लागली. बेकरी, अपयश आणि गरिबीने आलेल्या नैराश्याने ती मनोरुग्ण झाली. 

बाप अत्यंत दारुडा. या व्यसनामुळे त्याला आपला जीव गमावावा लागला. हे सर्व घडले, तेंव्हा तो केवळ 11 वर्षाचा होता. आता तो रस्त्यावर आला होता. सोबतीला केवळ चारच वर्षांनी मोठ्ठा असलेला भाऊ होता. दोघांनी ही जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार होता. अशा या प्रतिकूल परिस्थितीत त्याला आपले शिक्षण अर्ध्यातच थांबवावे लागले. 

मोठा भाऊ, भागात असलेल्या थेटर मध्ये काम करू लागला. मोठ्या भावाच्या मदतीने तो ही जुनियर आर्टिस्ट म्हणून मिळेल, ते काम मोठ्या हौसेने करू लागला. एक सर्वोत्तम अभिनेता बनण्याचं स्वप्नं तो पाहू लागला. आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेऊ लागला.  नाटकांमध्ये त्याला काम करायची संधी मिळू लागली. दोन प्रवेशाच्या मधल्या काळात तो नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा. 

1910 चा काळ अजूनही मुकचित्रपटांचाच होता. वयाच्या 21 व्या वर्षी तो इंग्लंड मधून अमेरिकेत आला. तो स्वतःचं चित्रपट बनवू लागला होता. विचित्र वाटणारे कपडे घातलेलं, छोटी बोलर टोपी आणि मोठे बूट, काठी आणि फेंगडी चाल. ढगळं विजार आणि तंग कोट, फाटका विटलेला शर्ट, खुळसट वाटणारा टाय आणि आखूड मिशा. हा त्याचा अवतार लोकांना खूप आवडला. 

वेंधळा, कुठेतरी पडणारा, धडपडणारा, कधी त्याच्यावर काही ना काही आदळतं, तर कधी तो कोणावर तरी आदळतो. असा सगळा मसाला असलेले, आपल्या अभिनयाने सतत खळखळून हसवणारे, विनोदी पात्र, त्यानं जगाला दिलं. 

प्रचंड मेहनत आणि दमदार अभिनयाच्या बळावर तो वयाच्या केवळ 27 व्या वर्षीच जगातील सर्वात अधिक मानधन घेणारा आणि सर्वात प्रसिद्ध कलाकार बनला. 


1968 साली 44 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी त्याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी चाहत्यांनी त्याला ऑस्करच्या इतिहासातले सगळ्यात मोठे Standing ovation दिले. सतत 20 मिनिटं लोकं उभे राहून, टाळ्या वाजवून त्याचा गौरव करीत होती. त्याला पुरस्कार दिला जात असताना, त्याने पुरस्कार स्वीकारल्यावर आभार व्यक्त करतानाही ते सतत उभेच होते. जगावर आपल्या अभिनयाने गारूड करणारा तो अभिनेता म्हणजेच चार्ली चॅप्लिन होय. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक दुःखद आणि नकारात्मक प्रसंग उभे राहतात. या नकारात्मक प्रसंगातून, सकारात्मक विचारांचा शोध घेऊन, ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीच जीवनात होऊ शकतात. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार करणे, फार आवश्यक आहे. हे चार्ली चॅप्लिन यांच्या खडतर प्रवासातून आपल्या लक्षात येते. 

अवती भवती असलेले घाणेरडे, नकारात्मक वातावरण, व्यसनी वडील, मनोरुग्ण आई, पोट भरण्यासाठी अकराव्या वर्षीच शिक्षणाला ठोकावा लागलेला रामराम, पोट भरण्यासाठी करावे लागलेले काबाडकष्ट, दुःखाचे,गरिबीचे आणि नैराश्‍याच्या अनेक कठीण प्रसंगाचा सामना करून देखील, आपले दुःख उगाळत न बसता, नकारात्मक विचारांना शरण न जाता, आपल्या ध्येयापासून परावृत्त न झाल्यामुळेच चार्ली चॅप्लिन आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

हृदयाला  स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन यांची तीन वाक्ये.....

1) या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. तुमचं दुःख सुद्धा.

2) मला पावसात चालायला आवडतं.कारण, पावसात माझे अश्रू कोणीच बघू शकत नाही.

3) ज्या दिवशी आपण हसलो नाही, तो दिवस आपल्या आयुष्यातला फुकट गेलेला दिवस.




1 comment:

Unknown said...

खुपच सुंदर आहे सर.