Thursday, April 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 135

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 135

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/135.html

अंगावर बसलेला साधा मच्छर उठवण्यासाठी, ज्याला आपला हात उचलता येत नाही. त्या व्यक्तीने पद्मश्री सारखा चौथा सर्वोच्च पुरस्कार मिळविला. त्याला हे कसे शक्य झाले ? कोण आहे हा यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

6 मे 1954 रोजी तामिळनातीतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील अयिकुडी यागावी, एका सामान्य कुटुंबात राम चा जन्म झाला. जात्याच हुशार असलेल्या रामने आपल्या बुदधिमत्तेच्या जोरावर 1970 साली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. चौथ्या वर्षाला असतानाच नौदलात भरती होण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि लगेचच अर्ज भरून तयारी देखील सुरू केली.

मुळातच जिद्दी स्वभावाचा राम, नौदल पात्रता परीक्षेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम चाचणीत झाडावरून Zig-Zag प्रकारची उडी मारत असताना राम खाली कोसळला. पाठीच्या कण्याला जबरदस्त मार बसला. मानेपासून खालचे संपूर्ण शरीर निर्जीव झाले. आपले पुढील संपूर्ण जीवन चाकाच्या खुर्चीवर बसून व्यतित करावे लागणार आहे. याची कल्पना त्याला वयाच्या 21 व्या वर्षी आली होती.

निराशा, भिती आणि चिंतेने ग्रासलेल्या रामवर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. येथे त्याची ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. अमरजितसिंह चहल यांच्याशी भेट झाली. डॉ.चहल यांनी राम च्या जखमेवर फुंकर घातले. त्याची समजूत काढली आणि जगण्याची नवी चेतना निर्माण केली.

रामने जगण्याचा नवा मार्ग शोधला. 1981 साली अमर सेवा संगम (डॉ.चहल यांच्या सन्मानार्थ) ही सामाजिक संस्था सुरू करून, त्याच्या माध्यमातून अपंग मुलांसाठी शाळा सुरू केली. संस्थेचा विस्तार आणि लौकिक वाढला. मोठा जनाधार मिळाला. गेली 4 दशकं अमर सेवा संस्था तिरूनवेली जिल्ह्यातील 300 हून अधिक गावातील 300 अपंग मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम करते आहे आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम, चाकाच्या खुर्चीवर बसलेला राम करतो आहे. भारत सरकारने 2020 साली पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने रामला सन्मानित करून त्याच्या या अतुलनीय कार्याचा गौरव केला आहे.तो राम म्हणजेच "एस. रामकृष्णन" होय. 

अपंगत्व हा शरीराला झालेला आजार आहे, मनाला नाही. ज्यावेळी मनाला अपंगत्व येते,त्यावेळी व्यक्ती जीवनातून हद्दपार झालेली असते. नेमका हाच विचार डॉ. चहल यांनी रामकृष्णन यांच्या मध्ये पेरला आणि त्याच्या जीवनाची दशाच बदलली. नैराश्य आल्यावर प्रेरणा देणाऱ्या शेकडो गोष्टी आपल्या अवतीभवती उपलब्ध असतात.गरज आहे तो फक्त डोळसपणे पाहण्याची आणि कृती करण्याची. डॉ. चहल यांनी दिलेली प्रेरणा रामकृष्णन यांनी डोळसपणे स्वीकारली आणि कृती केली. प्रेरणेची एक ठिणगी व्यक्तीचे जीवन बदलू शकते. हेच यावरून सिद्ध होते.

4 दशकं चाकाच्या खुर्चीवर बसून केवळ मन आणि मेंदू चा वापर करून रामकृष्णन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

अंगावर बसलेला साधा मच्छर उठवण्यासाठी, ज्याला आपला हात उचलता येत नाही. ती व्यक्ती पद्मश्री सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळवू शकते. आपण तर धडधाकट आहोत... विचार करा.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

1 comment:

Anonymous said...

सर ,
नमस्कार .
मी प्रा.बालाजी शिंदे ,गेली २५ वर्ष दिव्यांगजन ( Disabilities ) क्षेत्रात कार्यरत असून कर्णबधिर हे माझे कार्येक्षेत्र आहे . आपला अपंग क्षेत्रातील लेख वाचून कोणते आपंग हे कळत नाही ? कर्णबधिर (HI),अंध (VI) ,अस्थिवयंग (OH) ,की मतिमंद (MR) . लेखाचा आशय ठीक आहे , शुभेचा ,पण विकलांग किंवा अपंग म्हणून विसंगती वाटते . यात कोणती दिव्यांगता विशद होत नाही ?
अधिक माहिती साठी ...
Ministry of Social Justice and Empowerment ,Govt of India येथे भेट द्या .
कांही अधिक माहिती हवी असेल तर ,मिराज च्या कर्णबधिर शाळेत माझा सदर्भ देऊन श्री. गढवीर सर ( विशेष शिक्षक कर्णबधिर यांचेशी संपर्क साधा )

प्रा.बालाजी शिंदे.
9702158564
balajishinde65@gmail.com
www.ayjnihh.nic.in या माझ्या हॉस्पिटल च्या संकेत स्थळावर भेट द्या.