Sunday, June 7, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 171

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 171
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

एक तरुण जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होता. मोठे व्यापारी असलेल्या  वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्याला व्यवसाय सांभाळण्यासाठी,शिक्षण अर्धवट सोडून परतावे लागले. त्यावेळी तो केवळ एकवीस वर्षाचा होता. गुंतवणूकदारांच्या मते तो अपरिपक्व, अनुभवशून्य होता. त्याला हा डोलारा पेलणे अवघड होते. त्याला हे आव्हान पेलता आले का ? कोण असेल हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ??   जाणून घेऊ भागात... चला तर मग...

25 जुलै 1945 रोजी मुंबई येथे एका गुजराती शिया मुस्लिम कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा एक मोठे व्यापारी होते. 'राईस किंग ऑफ बर्मा' त्यांची ओळख होती. त्याच्या जन्माच्या वेळी आजोबांनी नुकतीच वनस्पती तुपाचे उत्पादन करणारी एक कंपनी स्थापना केली होती. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासूनच त्याला मिळाले होते. आजोबांच्या मृत्यूनंतर या कंपनीचा कारभार वडील पाहायचे.

1966 मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यामुळे व्यवसाय सांभाळण्यासाठी त्याला भारतात परत यावे लागले. त्याने व्यवसायाची सूत्रे हातात घेतली. पण, अनेकांनी तो अपरिपक्व, अनुभवशून्य असल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवला. बैठकीत अनेक शेअरधारक त्याच्या विरोधात उभे राहिले. चारही बाजूंनी त्याला नकारच नकार ऐकू येत होता. संघर्षाच्या काळात माणूस एकटाच असतो. असंच काहीसं झालं होतं. पण, याही परिस्थितीत तो डगमगला नाही. या परिस्थितीचा त्याने धैर्याने सामना केला. शेअरधारकांना आपल्यावर विश्वास ठेवण्याची त्याने विनंती केली. शिवाय शेअरधारकांचा मोठा नफाही करून देण्याची त्याने खात्री दिली. त्यामुळेच शेअरधारकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

तेल, तूप, वनस्पती तूप, साबण या सारख्या गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला नवे रूप, वळण आणि वलय निर्माण करून देण्यास सुरुवात केली. अनेक नव्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले. कंपनी नावारूपास येवू लागली. 1977 साली एक नवं आव्हान आणि एक नवी संधी त्याच्या समोर उभी राहिली. यावर्षी आयबीएम सारख्या कंपनीला भारत सोडावा लागला. येणाऱ्या काळाची पाऊले त्याने ओळखली. त्याने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. केवळ चारच वर्षात आपल्या कंपनीचा संगणक बाजारात आणला. येथूनच त्याने आपल्या कंपनीचे लक्ष साबनाकडून सॉफ्टवेअर कडे वळविले. आपल्या बुद्धी कौशल्याच्या, कष्टाच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्याने कंपनीला भारतातील सर्वात यशस्वी कंपनी बनविले आणि तो आयटी तंत्रज्ञानातील 'जार अर्थात सम्राट' म्हणून ओळखला जाऊ लागला. ती कंपनी म्हणजेच विप्रो आणि तो आयटी तंत्रज्ञानातील 'जार अर्थात सम्राट' म्हणजेच अजीम प्रेमजी होय.

अजीम प्रेमजी यांचा प्रवास अनेक समस्यांनी आणि संकटांनी व्यापला असल्याचे आपल्या लक्षात येते.
मी अजाण आहे. मी अल्पशिक्षित आहे. मला अनुभव नाही. नुकतेच माझे वडील वारले आहे. या पूर्वी मी अशी जबाबदारी पार पाडली नाही. इतकी मोठी जबाबदारी मला पेलणार नाही. या सारखी अनेक कारणे प्रेमजी यांना सांगता आली असती. विरोधकांचे ऐकून मैदानातून माघार घेता आली असती. संकटांपासून पळ काढता आला असता. पण, त्यांनी यापैकी काहीच केले नाही. ते या प्रत्येक संकटाला सामोरे गेले. कारण,त्यांचा स्वतःवर विश्वास होता.

आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर आपण काहीही करून दाखवू शकतो. याचा त्यांना विश्वास होता. म्हणूनच 2000 साली ‘एशिया विक’ने त्यांची जगातील 20 सर्वाधिक सामर्थ्यवान पुरुषांच्या यादीत निवड केली. ‘टाइम’ने 2004 मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 170* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/170.html

1 comment:

YES ! I CAN !!! said...

खूपच प्रेरणादायी लेखन .💐💐💐