Friday, January 28, 2022

भेट खर्‍याखुर्‍या यशवंताची...

1 जानेवारी 2018 रोजी "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" चा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. आजअखेर हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेत आजवर तब्बल 200 यशवंतांचा व त्यांच्या संघर्षशाली जीवन प्रवासावर प्रकाश टाकला आहे. 

ही लेखमाला आणि यशवंतांचा प्रवास वाचकांना खूपच भावला आहे. बावीस देशांतील वाचकांच्या 2 लक्ष भेटी ही त्याचीच प्रचिती. तसेच, वेळोवेळी हजारो वाचकांनी याबद्दल मेसेज आणि फोनच्या माध्यमातून माझ्याकडे त्या भावना व्यक्तही केल्या आहेत. 

आजवर मी लिहिलेल्या यशवंतांचा प्रवास, त्या त्या यशवंतांपर्यंत पोहचावा. अशी माझी मनोकामना. नंतरच्या काळात ती पूर्णही झाली. मा. मुरलीकांत पेटकर, मा.तात्याराव लहाने, मा.यजुर्वेंद्र महाजन, मा.पोपटराव पवार, मा.सिंधुताई सपकाळ, मा.हणमंतराव गायकवाड, मा.जयंती कठाळे यांच्यापर्यंत मी लिहिलेला लेख पोहोचला. त्यांनी आपल्या फेसबुक, ट्विटर सारख्या समाज माध्यमांवर प्रसिद्धीही दिली. यापुढे जाऊन मा. मुरलीकांत पेटकर, मा.तात्याराव लहाने यांनी प्रत्यक्ष फोन करून संपर्कही साधला. कौतुक केलं. हे बऱ्याच वाचक मित्रांना स्मरतही असेल. 

26 जानेवारी 2022 हा दिवस अनेक अर्थांनी माझ्या स्मरणात राहणारा दिवस ठरला. या दिवशी मी पहिल्यांदाच एका खऱ्याखुऱ्या यशवंताला भेटलो. ते यशवंत म्हणजेच मा.मुरलीकांत पेटकर होय. 

22 जुलै 2021 रोजी मी त्यांच्यावर लिहिलेला लेख त्यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी फोनवर संपर्क साधला. लेखाचं अन् लेखनाचं कौतुक केलं. शिवाय, पुणे येथील घरी भेट देण्याचं निमंत्रणही दिलं. त्यांचे पुत्र श्री.अर्जुन यांनी माझा नंबर 'सेव्ह' करून घेतला. मग मी नियमितपणे व्हॉट्स ॲपवर संवाद साधू लागलो. 

1965 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. या युद्धात त्यांनी तब्बल नऊ गोळ्या आपल्या अंगावर झेलल्या. एक गोळी अद्यापही त्यांच्या कंबरेत आहे. पाकिस्तान विरुद्ध त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा सन्मान भारत सरकारने केला आणि त्यांना कार्वे ता.वाळवा, जि.सांगली येथे शेतजमीन बक्षीस म्हणून दिली.शिवाय, त्यांचे मूळगाव इस्लामपूर जवळील पेठ. त्यामुळे पेटकर कुटुंबियांचे सांगलीत वरचेवर येणं -जाणं असतं.

26 जानेवारी च्या सकाळी सहजच श्री.अर्जुन पेटकर यांचा स्टेटस पाहिला. सभोवती असलेल्या निसर्गावरून ते गावी आले असतील. असा माझा समज झाला. "आपण गावी आला आहात काय ??" असा मेसेज केला. ठीक साडे अकरा वाजता श्री. अर्जुन पेटकर यांचा फोन आला. "दादा, कार्वे येथे आहेत. तासाभरात आम्ही पुण्याला जाणार आहोत. शक्य असेल तर, आपण त्यांना भेटू शकता." 

योगायोगाने मी कार्वे पासून केवळ 10 किमी अंतरावरच होतो. माझ्या सहकारी शिक्षिका सौ.सुनंदा पाटील यांच्या येडेनिपाणी येथील घरी भेट देण्यासाठी सर्व सहकारी शिक्षिकांना घेऊन मी तेथे पोहोचलो होतो.त्यामुळे, मी लगेच त्यांना होकार कळवला आणि पुढच्या पाच मिनिटात सहकारी शिक्षिकांना घेऊन, मी कार्वे चा रस्ताही पकडला. अगदी 15 मिनिटात आम्ही पोहोचलो. गावातून बाहेर हायस्कूलकडे, असलेल्या टेकडीकडे वळलो. एका चिराचे बांधकाम असलेल्या घरासमोर आमची गाडी थांबली. 

घराबाहेर दोन्ही हातांत कुबड्या घेऊन एका खुर्चीवर विराजमान असलेल्या, कोट परिधान केलेल्या, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना पहिल्यांदाच समक्ष पाहत होतो. 

अगदी हसतमुखानं पेटकर दादांनी सर्वांचं स्वागत केलं. एका पद्मश्री विजेत्या व्यक्तीला समोर पाहून माझ्या वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीमती शोभाराणी लोखंडे मॅडम, श्रीमती सुरेखा पाटील मॅडम व श्रीमती वैशाली कोळी मॅडम यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. माझी स्थिती वेगळी नव्हती. दादांची ती काया पाहताना, मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. त्यांना समोर पाहताना माझा ऊर अभिमानाने भरून आला होता. 

गप्पांचा ओघ सुरू झाला. दादांनी त्यांच्या बालपणापासून सुरूवात केली. सांगली जिल्ह्यातील पेठ सारख्या खेडेगावात, एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुरा करता आला नाही. वयाच्या सतराव्या वर्षीच ते सैन्यात भरती झाले. सैन्यात राहून खेळात नाव लौकिक मिळवण्याची खूप मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली. 1965 साली भारत-पाक युध्दात ते जबर जखमी झाले. 9 गोळया शरीरावर झेलल्या. कमरेखालीचे शरीर लुळे पडल्याने, त्यांना चाकच्या खुर्चीचा आधार घ्यावा लागला. पण, अशा कठीण प्रसंगातही त्यांनी धीर सोडला नाही. पुन्हा नव्यानं उभं राहण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी विविध स्पर्धा गाजविल्या.

1972 साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला त्यांनी पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 127 सुवर्णपदकं, तर 154 रौप्यपदकं त्यांनी पटकावली आहेत. भारत सरकारने त्यांना पदकांचा राजा म्हणून गौरविले आहे. त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेऊन 2018 साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. भूतकाळ कथन करत असताना दोनवेळा दादांचा कंठ दाटून आला. 

भारत सरकारच्या "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमामध्ये दादांचा कृतिशील सहभाग आहे. त्यांचे चिरंजीव श्री.अर्जुन हे देखील एक उत्तम गिर्यारोहक असून 'खेलो इंडिया'च्या निवड समितीवर नियुक्त आहेत. दादांची नात समृद्धी कथ्थक शिकत असून, नातू ओम देखील गिर्यारोहन, स्केटिंग, तबला वादन आदी कला क्रिडाप्रकारात पारंगत आहे. दादांची सून राखीताई या उच्च शिक्षित असून, त्या दादांची उत्तम काळजी घेतात. 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असूनही दादांची नाळ मातीशी जोडलेली आहे. आजही ते सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी सदैव तयार असतात. कुठलाही बडेजावपणा त्यांच्या बोलण्या-वागण्यातून जाणवला नाही. शिवाय, त्यांचे कुटुंबीयही भेटीला आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करतात. दादांचा या साधेपणातच त्यांचा मोठेपणा लपलेला दिसून आला. 

दादांच्या सानिध्यात एक तास कसा निघून गेला. हे समजलंच नाही. दादांचा निरोप घेताना त्यांचा चरणस्पर्श करण्याचा मोह आवरला नाही. दादांनीही भरभरून आशीर्वाद दिला. अन् पुण्याला घरी येण्याचं निमंत्रणही दिलं.

एका पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीला भेटायला आलेला मी, दादांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आदरातिथ्याने भारावून गेलो. दादांसोबत च्या या भेटीने मला प्रचंड ऊर्जा मला मिळाली आणि माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय या दिवसांमध्ये 26 जानेवारी 2022 या दिवसाची नोंद झाली. 

🎯 अधिक फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


धन्यवाद...!!!









1 comment:

Avinaskarpe said...

Very nice... प्रेरणादायी