Thursday, October 3, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 117

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 117*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.* 

आई - वडिलांचे स्वप्नं पूर्ण करणाऱ्या, एका मुलीच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

17 मार्च 1990 रोजी हरियाणातील हिसार येथे तिचा जन्म झाला. हरियाणा म्हणजे सर्वाधिक स्त्री-भ्रूणहत्येसाठी बदनाम असलेलं राज्य. साहजिकच तिच्या जन्माने आजीचा भ्रमनिरास झाला. तिला वंशाला दिवा हवा होता. ती नकुशी झाली. आजीने तिचं तोंड देखील पाहिलं नाही. आजी मागासलेल्या आणि बुरसट विचारसरणीची होती. परंतु, तिचे आई-वडील दोघेही उच्चशिक्षित असल्याने, त्यांनी आजीच्या या विचारांना फारसं महत्त्व दिलं नाही.

वडील हरियाणातील कृषी विद्यापीठात कार्यरत होते तर, आई राज्यस्तरावरील बॅडमिंटन खेळाडू. तिला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व्हायचं होतं. पण, ते शक्य झालं नाही. आपल्या मुलीनं स्वप्नं पूर्ण करावं. ही तिची तळमळ. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच तिच्या हातात बॅडमिंटन रॅकेट आले. वडिलांची बदली हैद्राबाद मध्ये झाली. तिचे पुढील शिक्षण हैद्राबादमध्ये झाले. हैद्राबादमधील सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षाचा होता.

वयाच्या आठव्या वर्षी तिच्या बॅडमिंटन प्रशिक्षणास सुरुवात झाली. येथे तिला अतिशय उत्तम प्रशिक्षक लाभले. तिच्या बॅडमिंटन मधील कौशल्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. तिचे वडील तिला दररोज सकाळी 6 वाजता आपल्या स्कुटरवर बसवून 20 किमी दूर असलेल्या मैदानावर सरावासाठी घेवून जायचे. तेथून लगेचच शाळेत. दुपारी शाळा सुटल्यानंतर आई पुन्हा तिला 20 किमीवर असलेल्या मैदानावर सरावासाठी घेवून जायची. तेथून ती रात्री 9.30 लाच घरी यायची. दररोज 100 किमी प्रवास करून तिची प्रचंड दमछाक व्हायची. गुडघे दुखायचे. परंतु तिने खेळ सोडला नाही. कारण, एकच तिला बॅडमिंटन खेळात नाव कमवायचे होते. ते तिचे स्वप्नं होते. त्यासाठी तिची मेहनत करायची तयारी होती.

बॅडमिंटन चे प्रशिक्षण घेताना, मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. तिच्या वडिलांनी आपला भविष्य निर्वाह निधी मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि वडील करत असलेल्या खर्चाची तिला जाणीव होती. त्यामुळेच, ती अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करत होती. तिच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ तिला वेगवेगळं स्पर्धात मिळायचेच. शालेय, आंतरशालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ती यशस्वी होत गेली. वेगवेगळ्या स्पर्धात तिने भारताचे नेतृत्व केले. 2012 साली झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत तिने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावले. असा पराक्रम करणारी ती पहिलीच महिला भारतीय ठरली. ती महिला म्हणजेच सायना नेहवाल होय. 

सायनाला आपल्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. सुरुवातीच्या काळात करावा लागलेला प्रवास असो, की पाय आणि गुढघे दुखीचा त्रास, झालेले पराभव असोत किंवा टीकाकारांनी केलेली टीका असो. या सर्वावर तिच्याकडे एक उपाय आहे. तो म्हणजे कठोर मेहनत आणि सातत्य. तिच्या या उपायाने तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. 

बरेच पालक मुलांच्या शिक्षणासाठी अतोनात खर्च करत असतात. परंतु, मुलांना याची जाणीव नसते. त्यामुळेच आईवडील खर्च करत असलेल्या, पैशावर मौजमजा करणे, मस्ती करणे, फिरणे यासारख्या गोष्टींवर त्यांचे लक्ष अधिक केंद्रित झालेले असते. साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्षच होते. 

आई-वडील आपल्यासाठी, त्यांच्या भविष्याची जमापुंजी खर्च करतात. परंतु आपल्याला ते करत असलेल्या कष्टाची बिलकुल जाणीव नसते. त्यामुळेच ऐन तारुण्यात आपले लक्ष विचलित होऊन, आपण ध्येयापासून दुरावतो. तेव्हा, आपल्या ध्येयावर सायनासारखे लक्ष केंद्रित करणं आणि तिच्यासारखी मेहनत, कष्ट करून आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणं. यशस्वी होणं. हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. याची जाणीव आजच्या तरुण-तरुणींनी ठेवली पाहिजे.


सायनाला भारत सरकारने अर्जुन, खेलरत्न, पद्मश्री आणि पद्मविभूषण असे मानाचे पुरस्कार तिला मिळाले आहेत. म्हणूनच, ती एक यशवंत आहे. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

3 comments:

shbnm shikalgar said...

Ha lekh khup sundar hota.. asech chan chan lekh aani bhavishyasathi upyogi yenar ashe lekh post kara...

shbnm shikalgar said...

Ha lekh khup sundar hota.. asech chan chan lekh aani bhavishyasathi upyogi yenar ashe lekh post kara...

shbnm shikalgar said...

Ha lekh khup sundar hota.. asech chan chan lekh aani bhavishyasathi upyogi yenar ashe lekh post kara...